Thursday, June 13, 2024

दुःखद! प्रतिभावान लेखक शिरीष कणेकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

मनोरंजनविश्वातून अजून एक दुःखद बातमी समोर येत आहे. जेष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मनोरंजनविश्वाला आणि पत्रकार जगाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान शिरीष यांचा जन्म ६ जून १९४३ रोजी पुण्यात झाला होता. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली. शिरीष कणेकर यांचे वडील विख्यात डॉक्टर असल्याने त्यांचे बालपण भायखळा येथील रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानामध्ये गेले. क्रीडा पत्रकारितेसाठी देखील शिरीष यांना ओळखले जायचे. त्यांनी पत्रकार म्हणून इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांतून काम केले. पुढे त्यांनी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना आदी सर्वच मोठ्या आणि गाजलेल्या मराठी वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले. त्यांचे स्तंभलेखन खूपच प्रसिद्ध झाले. यासोबतच त्यांचे अनेक लेख हे साप्ताहिक मनोहर, लोकप्रभा, चित्रलेखामध्ये प्रसिद्ध झाले होते.

शिरीष काणेकर यांच्या ‘लगाव बत्ती’ या त्यांच्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता. शिरीष कणेकर यांनी सिनेमा, क्रिकेट, राजकारण यावर स्तंभलेखन केले शिवाय कणेकरी, फिल्लमबाजी, शिरीषासन यातून त्यांनी त्यांच्या विनोदी लेखनाची बाजू देखील लोकांना दाखवली.

क्रिकेट-वेध , गाये चला जा, यादों की बारात, पुन्हा यादों की बारात, ते साठ दिवस, डॉलरच्या देशा, कणेकरी , नट बोलट बोलपट, शिरीषासन , पुन्हा शिरीषासन, फिल्लमबाजी, शिणेमा डॉट कॉम, आंबटचिंबट, इरसालती, एकला बोलो रे, कट्टा, गोतावळा, चर्पटपंजरी, चहाटळकी, चापटपोळी, डॉ. कणेकरांचा मुलगा, फटकेबाजी, नानकटाई आदी अनेक प्रकारचे हिंदी मराठीमध्ये विपुल लेखन त्यांनी केले.

शिरीष कणेकर यांच्या ‘सूरपारंब्या’ या लेखसंग्रहास सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच मुंबई पत्रकार संघातर्फे दिला जाणारा ‘कै. विद्याधर गोखले ललित साहित्य पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

हे देखील वाचा