Monday, July 1, 2024

कसलं लॉकडाऊनचं घेऊन बसलायत? ‘या’ कलाकारांनी घेतलीय लॉकडाऊनमध्ये करोडोंची प्रॉपर्टी

साल २०२० मध्ये, कोरोना काळात प्रत्येकाचं आर्थिक नुकसान केलं आहे. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये लहान दुकाने ते कारखान्यांपर्यंत सारं काही ठप्प पडलं होतं. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीचं चित्रीकरणही जवळपास तीन ते चार महिने बंदच होतं. चित्रपटगृह, नाट्यगृह तर अजूनही निर्जन आहेत. आशा आहे की येणारा काळ प्रत्येकासाठी सामान्य असेल. परंतु, यादरम्यान बॉलिवूडच्या अनेक स्टार्सवर मात्र या लॉकडाऊनमुळे काहीही आर्थिक परिणाम झाला नाही. उलट त्यांनी लक्झरी बंगल्यापासून ते लक्झरी कारपर्यंत खरेदी केली आहे. कोण आहेत हे स्टार्स आणि अशी काय खरेदी त्यांनी केली आहे हे आपण पाहणार आहोत.

अजय देवगण
यावर्षी अगदी सुरुवातीलाच अजय देवगणचा तानाजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ पैसादेखील कमावला होता. यानंतर कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे अजयचा यावर्षी एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. परंतु या सगळ्याचा त्याच्या लाईफस्टाईलवर काडीमात्रही फरक पडला नाही. लक्झरी गाड्यांची आवड असलेल्या अजयने यावर्षी त्याच्या गाड्यांच्या ताफ्यात आणखीन एका नव्या गाडीचा समावेश केला. त्याने यावर्षी तब्बल एक कोटी किमतीची बीएमडब्ल्यू एक्स सेव्हन ही लक्झरी कार खरेदी केली.

हृतिक रोशन
माध्यमांनुसार, यावर्षी ऑक्टोबरमध्ये हृतिकने त्याच्या स्वप्नांतील घर खरेदी केलं आहे. जुहू वर्सोवा लिंक रोडला लागून असलेल्या एक इमारतीमध्ये त्याने हे आलिशान घर विकत घेतलं आहे. या इमारतीच्या १४ व्या आणि १५ व्या मजल्यावर हे फ्लॅट्स असून ३८००० स्क्वेअरफीट एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. या इतक्या मोठ्या फ्लॅटसाठी ९७ कोटी रुपये मोजले आहेत. लवकरच हृतिक संपूर्ण कुटुंबासह या नव्या घरात राहायला येणार आहे.

नेहा कक्कर
गेल्या काही वर्षांपासून संगीत क्षेत्रामध्ये गायिका नेहा कक्कर हिचाच बोलबाला आहे. नेहा कक्करने मार्चमध्ये एक फोटो शेअर करुन हृषीकेश येथे एक अतिशय सुंदर बंगला खरेदी केल्याची माहिती दिली. या फोटोत आपल्याला बंगल्यासोबतच मर्सिडीज कार देखील उभी असल्याचं दिसत आहे. नेहाचं घर पांढर्‍या रंगांच्या थीमवर बांधलं गेलं आहे आणि ते खूपच सुंदर दिसत आहे. नेहाने आपले बालपण हृषीकेशमध्येच घालवलं आहे.

आलीया भट
आलियाने मुंबईच्या वांद्रेमध्ये एक आलिशान सदनिका खरेदी केली आहे. या सदनिकेचं क्षेत्रफळ २४६० चौरस फूट आहे. सोबतच ही सदनिका मुंबईच्या सर्वाधिक पॉश भागात बांधली गेली आहे. माध्यमांनुसार, आलियाने सदनिकेसाठी ३२ कोटींची मोठी रक्कम मोजली आहे.

अर्षद वारसी
बॉलिवूडमध्ये अर्षद वारसीची एक वेगळीच ओळख आहे. आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्याने विविध भूमिका साकारून त्याचं अभिनयातील अष्टपैलूत्व सिद्ध केलं आहे. यावर्षी असुर या हिट वेब सीरिजद्वारे अर्षद वारसीने ओटीटी प्लॅटफॉर्म वर आपलं वर्चस्व राखलं. लॉकडाउनच्या काही दिवस अगोदर त्याने गोव्याच्या मुख्य ठिकाणी एक लक्झरी व्हिला विकत घेतला. ही व्हिला १८७५ मध्ये बांधली गेलेली हेरिटेज प्रॉपर्टी आहे.

हे देखील वाचा