Wednesday, December 3, 2025
Home कॅलेंडर थेट टक्कर! स्वबळावर पुरुष कलाकारांपेक्षाही हिट सिनेमे देणाऱ्या बॉलीवूडच्या पाच रणरागिनी

थेट टक्कर! स्वबळावर पुरुष कलाकारांपेक्षाही हिट सिनेमे देणाऱ्या बॉलीवूडच्या पाच रणरागिनी

१२ जानेवारी म्हणजेच राष्ट्रीय युवा दिवस. स्वामी विवेकानंद यांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. स्वामी विवेकानंदानी तरुण पिढीसाठी खूप कार्य केले. आज तरुणांचे प्रेरणास्थान म्हणून विवेकानंद प्रसिद्ध आहे. ‘उठा जागे व्हा, आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही.’ असा संदेश त्यांनी तरुणांना दिला. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल ६५ टक्के लोकसंख्या फक्त युवा आहे. म्हणूनच आपल्या देशाला तरुणांचा देश म्हणून ओळख मिळाली आहे. हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्री ह्या तरुण पिढीचे प्रतिनिधीत्व करत आहे. आपल्या हिंदी सिनेसृष्टीतल्या काही अभिनेत्रींनीं तर स्वबळावर चित्रपटांना यश मिळवून दिले आहे. पाहूया अशाच काही अभिनेत्रीची नावे.

कंगना राणावत :

२००६ साली इम्रान हाश्मीसोबत ‘गँगस्टर’ चित्रपटातून कंगनाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर तिने या क्षेत्रात कोणच्याही पाठिंब्याशिवाय यश मिळवून दाखवले. कंगनाने मसाला चित्रपटांसोबतच आशयपूर्ण सिनेमे देखील अभिनयाच्या जोरावर यशस्वी करून दाखवले. क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी, तनु वेड्स मनु, फॅशन, काइट्स, सिमरन, रिवॉल्वर रानी, पंगा अशा अनेक चित्रपटातून तिने तिची अभिनयाची चुणूक दाखवली. कंगनाला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी दोनदा मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शिवाय तिला भारत सरकारचा सर्वोच्च अशा पद्मश्री पुरस्कार देखील दिला गेला आहे.

दीपिका पदुकोण:

दीपिकाने हिंदी सिनेसृष्टीत येण्याआधी कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्या’ मधून अभिनयाची सुरुवात केली. २००७ साली आलेल्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटाने तिला एका रात्रीत स्टार केले. दीपिका तिच्या जिवंत अभिनयाने मिळलेले यश कायम ठेवत किंबहुना त्यात वाढ करत पुढे जात राहिली. दीपिकाला देखील अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ प्रतिभेच्या जोरावर एवढे यश मिळवता आले. पीकू, कॉकटेल, पद्मावत, चेन्नई एक्सप्रेस, तमाशा, बाजीराव मस्तानी, रामलीला, लव आज कल छपाक सारख्या मसाला आणि आशयसंपन्न चित्रपटांमध्ये तिने काम केले. दीपिकाने बॉलीवूड सोबतच हॉलिवूडमध्येही देखील काम केले. आजच्या घडीला दीपिका सर्वात जास्त फी घेणारी अभिनेत्री आहे.

आलिया भट्ट:

२०१२ साली आलेल्या ‘स्टूडेंट ऑफ द इयर’ चित्रपटातून आलियाने अभिनयाची कारकीर्द सुरु केली. तिने गली ब्वॉय, डियर जिंदगी, राजी, उड़ता पंजाब यांसारख्या हिट सिनेमातून स्वतःला अभिनयाच्या बाबतीत पुरेपूर सिद्ध केले. २०१४ साली फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी यादीत तिचा समावेश झाला होता. शिवाय २०१७ साली फोर्ब्स आशिया अंडर ३० यादित सुद्धा तिचा समावेश झाला.

तापसी पन्नू :

तापसीने तिच्या फिल्मी करियरची सुरुवात तेलगू चित्रपटांमधून केली. २०१३ साली आलेल्या ‘चश्मेबद्दूर’ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. मात्र या चित्रपटानंतर तिला फारसे काम मिळाले नाही. तिने जिद्दीने आणि मेहनतीने  प्रयत्न सुरु ठेवले. पिंक, बदला, मुल्क, सूरमा, मिशन मंगल, सांड की आंख, नाम शबाना, बेबी अशा अनेक सुपरहिट सिनेमात तापसी दिसली. आज तापसीचे नाव मोठ्या अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते.

प्रियांका चोप्रा :

मिस वर्ल्डचा ‘किताब जिंकणाऱ्या प्रियंकाने २००३ साली ‘द हीरो लव स्टोरी ऑफ ए स्पाई’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्याआधी तिने तेलगू चित्रपट देखील केला होता. प्रियंकाला खरी ओळख दिली ती २००४ साली आलेल्या ‘ऐतराज’ चित्रपटाने. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पहिले नाही. ‘फॅशन’ सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते. शिवाय तिला पदमश्री हा सर्वोच्च सन्मान देखील मिळाला आहे. प्रियांकाने हिंदी चित्रपटांसोबतच हॉलिवूडमध्ये देखील ओळख मिळवली आहे.

हे देखील वाचा