बॉलिवूडमध्ये दरवर्षी लहान- मोठे अनेक सिनेमे प्रदर्शित होतात. मात्र, यातले अगदी मोजके सिनेमे प्रदर्शनाच्या अनेक वर्षानंतरही प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करतात. अशा सिनेमाच्या चर्चा देखील खूप रंगतात. अगदी काल- पर्वा सिनेमा प्रदर्शित झाल्यासारख्या या चित्रपटाच्या बातम्या येतात, चर्चा होतात. याच विभागात मोडणाऱ्या सिनेमांमध्ये एक नाव प्रकर्षाने येतेच आणि ते नाव म्हणजे अनिल शर्मा यांचा ‘गदर: एक प्रेमकथा’. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने लोकप्रियेचे शिखर गाठले होते.
आज 20 वर्षांनंतरही या सिनेमाची कथा, कलाकारांचा अभिनय, गाणी, संवाद, सीन आजही रसिकांच्या लख्ख स्मरणात आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी अनेक चांगल्या आणि हिट सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. ‘गदर’ सिनेमाला 20 वर्ष पूर्ण झाल्यामुळे एका मुलाखतीमध्ये अनिल शर्मा यांनी या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोबतच सिनेमातील हॅन्डपंप सीनबद्दल देखील सविस्तर माहिती दिली.
अनिल शर्मा यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी जेव्हा हा सीन लिहित होतो, तेव्हा मला वाटले की अमरीश पुरी यांच्यावर संपूर्ण इमारतच पाडावी. मग मी पुन्हा विचार केला, तेव्हा मला वाटले की हे खरे वास्तवदर्शी वाटणार नाही. यासाठीच मी सीनमध्ये हॅन्डपंप लावायचे ठरवले. हा सीन फक्त हॅन्डपंप उखाडायचा सीन नव्हता, तर भावनांचा होणारा प्रतीकात्मक विस्फोट होता. लोकांनी मला या सीनबद्दल अनेक प्रश्न विचारले की, हे कसे काय शक्य आहे? तेव्हा मी त्यांना सांगितले रामायणात लक्ष्मणाला संजीवनी बुटीची गरज होती, तेव्हा हनुमानाने संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. माझ्या सिनेमात तारा सिंग हा काय हनुमान नव्हता. मात्र, तो हॅन्डपंप नक्कीच उचलू शकतो.”
पुढे अनिल शर्मा म्हणाले, “आपण भावनांच्या रूपाने जोडले गेल्यामुळे हनुमानाच्या कार्यावर विश्वास ठेवतो. हा लिहिण्यामागे आमची रचनात्मक स्वतंत्रता होती. अनेक बुद्धिजीवी लोकांनी या सीनवर खूप प्रश्न उपस्थित केले होते. या सीनसोबत खूप लोकं सहमत देखील नव्हते. मात्र, अनेक लोकं भावनांवर विश्वास ठेवणारे आहेत आणि भावनांना कोणतीच भाषा नसते.”
‘गदर: एक प्रेमकथा’ या सिनेमात भारत आणि पाकिस्तान यांच्या भावना देखील खूप महत्त्वाच्या होत्या. एक मुलगा आपल्या आईला परत आणण्यासाठी वडिलांकडे हट्ट करतो. अगदी रामायणातील कथेप्रमाणेच. हा सिनेमा हिट होण्यामागे भारत पाकिस्तान हा भाग पुरेसा नव्हता, याला प्रेमकथेचा आणि भावनांची देखील जोड होती.”
“गदर: एक प्रेमकथा” हा सिनेमा 15 जून,2001 रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने यशाचे अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले.
हेही नक्की वाचा-
–….आणि वैगातलेल्या सनी देओलने सख्खा भाऊ बॉबीच्या मारली होती कानाखाली
–सनी देओलच्या दुश्मनांच्या यादीत आमिर, शाहरुखसह 5 अभिनेते सामील; ‘या’ अभिनेत्याचा तर दाबला होता गळा