दिवंगत अष्टपैलू कलाकार कादर खान आपल्याला आठवत असतीलच! नव्वदीच्या दशकात त्यांनी आपल्याला पोट धरून हसायला लावलं. त्यांना ठरवूनही विसरता येणं निव्वळ अशक्य आहे. 60ते 70 च्या दशकातील सिनेमे जर आपण पाहिले तर कादर खान आपल्याला खलनायकाच्या भूमिकेत दिसतात. त्यांनी त्याकाळी जितके सिनेमे केले त्यातील 90 टक्के सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या. सोबतच कादर खान हे उत्तम लेखक होते त्यामुळे सिनेमे देखील लिहीत असत. यानंतर 80 आणि नव्वदीच्या दशकात कादर खान यांनी त्यांची भूमिकाच बदलली. त्यांनी विनोदी भूमिका स्वीकारायला सुरुवात केली आणि विनोदी अभिनेते म्हणून देखील त्यांनी भरपूर प्रसिद्धी मिळवली. तर असे जे कादर खान साहेब यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी आज आपण उलगडणार आहोत.
कादर खान यांचा जन्म हा 11 डिसेंबर1937 साली काबूल, अफगाणिस्तान येथे झाला. कादर साहेबांच्या जन्माशी निगडित एक खास किस्सा आहे. आजही हा किस्सा इंडस्ट्रीतील जुन्या कलाकारांच्या तोंडी ऐकायला मिळतो. सांगितलं जातं की कादर खान यांच्या आईला 3 मुलं झाली होती. परंतु काही ना काही कारणाने वयाची आठ वर्षे पूर्ण होण्याआधीच तिघेही दगावले. यानंतर मग कादर खान यांचा जन्म झाला. कादर खान जगावेत म्हणून त्यांच्या आईने काबूल सोडलं आणि भारतात येऊन स्थायिक झाल्या.
आणखी एक किस्सा सांगितला जातो की, कादर खान हे फक्त वर्षभराचे असतील जेव्हा त्यांच्या आईवडिलांचा तलाक (घटस्फोट) झाला. त्यानंतर कादर खान यांच्या आयुष्यात खूप कठीण काळ आला. परिस्थिती फार हालाखीची होती. इतकी की कादर खान हे लहान वयातच एक मशिदी बाहेर भीक मागू लागले. यात जे काही पैसे मिळायचे त्यातून मग घरी रात्रीची चूल पेटत असे. कालांतराने त्यांच्या आईने एक असा निर्णय घेतला ज्यामुळे कादर खान यांचं आयुष्यच बदलून गेलं. कादर यांच्या आईने त्यांना भीक मागणं बंद करायला सांगून त्यांना अभ्यासाकडे संपूर्ण लक्ष देण्यास सांगितलं. यानंतर कादर खान यांनी खूप मन लावून अभ्यास केला आणि एकेदिवशी त्यांना महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळाली.
या सगळ्यात नंतर त्यांना नाटकाची आवड निर्माण झाली. नोकरी सांभाळून ते नाटकाच्या ग्रुपमधून वेगवेगळ्या नाटकांमध्ये अभिनय करू लागले. एकेदिवशी त्यांच्या एका प्रयोगाला सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार आले होते. दिलीप कुमार यांना कादर साहेबांचं काम इतकं आवडलं की त्यांनी कादर खान यांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांना मुंबईत सिनेमात काम करण्यासाठी बोलावलं. या सुवर्णसंधीचं कादर खान साहेबांनी सोनं केलं आणि तिथून ते आज पर्यंतचा सर्व इतिहास आपल्याला ठाऊक आहेच.
कादर खान यांच्याबद्दल बोललं जातं की मृत्यूच्या पाच दिवस आधीपासून त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला होता. त्यांनी आपल्या सुनेच्या हातून शेवटचं अन्न ग्रहण केलं होतं. बॉलिवूडच्या या महान कलाकाराने 31 डिसेंबर 2018 ला टोरंटो, कॅनडा येथे अखेरचा श्वास घेतला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
महानायक अमिताभ बच्चन यांना ‘सर जी’ न म्हटल्यामुळे कादर खान यांना मिळाली होती शिक्षा, ऐका त्यांच्याच तोंडून
क्या बात है! तब्बल ४७ वर्षांपूर्वी कादर खान यांना डायलॉग लिहिण्यासाठी मिळायचे ‘इतके’ लाख रुपये