बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा चित्रपट जेव्हा पडद्यावर प्रदर्शित होतो, तेव्हा त्याच्या चाहत्यांमध्ये एक वेगळी क्रेझ पाहायला मिळते. सलमानच्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना एकत्रितपणे रोमांस, अॅक्शन, इमोशन आणि कॉमेडीचा डोस मिळतो. 90 च्या दशकापासून सलमान अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसला आहे. तसेच, जवळपास 15 चित्रपटांत सलमानचे नाव प्रेम आहे, हे तुमच्या लक्षात आले आहे का? तर आपण आज प्रेम नाव असण्यामागचे कारण जाणून घेऊयात.
सलमान खानचा पहिला सुपरहिट चित्रपट ‘मैने प्यार किया’, हा 1989 साली रिलीझ झाला होता. सूरज बड़जात्या दिग्दर्शित या चित्रपटाला जबरदस्त यश मिळाले होते. या चित्रपटात सलमान खानने प्रेम नावाच्या मुलाची भूमिका केली होती. चित्रपटात त्याच्या व्यक्तिरेखेला चांगलीच पसंती मिळाली होती.
हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर, दिग्दर्शक-अभिनेत्याच्या जोडीने ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ हैं’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ अशा अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. सर्वात खास गोष्ट अशी होती की या सर्व चित्रपटांमध्ये सलमान खानचे नाव प्रेमच होते. सूरज बड़जात्या या नावाबद्दल म्हणाले होते की, “प्रेम नावाच्या व्यक्तीचा अर्थ असा होतो की, जो परंपरेने त्याच्या मुळांशी संबंधित आहे, तो मजा करतो पण त्याला आपल्या कुटूंबात राहायला आवडते. तो मनाने चांगला आहे.”
चित्रपटात सलमानचे नाव प्रेम ठेवण्याची सुरूवात राजश्री प्रॉडक्शनचा सुपरहिट चित्रपट ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’ पासून झाली. प्रेम कृष्णा या चित्रपटाचे नायक होते आणि चित्रपटातही त्यांचे नाव प्रेमच होते. या नावाने हा चित्रपट हिट झाला असेल, तर आपण पुढच्या प्रत्येक चित्रपटात हे नाव का न वापरावे, कदाचित यामुळे तेही हिट होऊ शकतील, असा विचार त्या वेळी बडजात्यांनी केला होता.
अशा परिस्थितीत, प्रत्येक राजश्री चित्रपटात सलमानचे नाव प्रेम ठेवले गेले आणि सर्व चित्रपट हिटही झाले होते. केवळ राजश्रीच नव्हे तर अन्य दिग्दर्शकांनीही सलमानला आपल्या चित्रपटात प्रेम नाव दिले आणि जवळजवळ सर्व चित्रपट हिट झाले. ‘अंदाज अपना अपना’, ‘मैंने प्यार क्यों किया’, ‘जुडवा’, ‘दिवाना मस्ताना’, ‘बिवी नंबर 1’, ‘कही प्यार ना हो जाये’, ‘नो एन्ट्री’, ‘पार्टनर’, ‘रेडी’ या हिट चित्रपटांमध्ये सलमानचे प्रेम नाव होते.










