भारत, पाकिस्तान यांची फाळणी झाल्यानंतर अनेक गोष्टी विभाजित झाल्या. लोकांनी त्यांना पाहिजे त्या देशात जाऊन राहायला सुरुवात केली. आजही ह्या फाळणीमुळे बऱ्याच भारतीय लोकांची खानदानी घरं पाकिस्तानात अजूनही आहे. त्यात सामान्य लोकांपासून ते अगदी कलाकारांपर्यंत अनेक जणांचा समावेश आहे.
बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची घरे आजही पाकिस्तानात पाहायला मिळतील. शोमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज कपूर यांच्या पासून ते ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांच्यापर्यंत अनेक कलाकारांची घरे आजही पाकिस्तानमध्ये आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारने या दोन्ही कलाकारांच्या खानदानी घरांचे रूपांतर एका संग्रहालयात करण्याचे सांगितले आहे. या दोन्ही कलाकारांचे घर हे पाकिस्तानातील पेशावर शहराच्या खैबर प्रांत मधल्या किस्सा ख्वानी बाजार परिसरात आहे. या दोन्ही महान कलाकारांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावरच बॉलिवूडचा बादशहा असणाऱ्या शाहरुख खानच्या वडिलांचे देखील घर आहे.
शाहरुख खानचे घरं हे किस्सा ख्वानी बाजार जवळील शाहवाली कताल भागात आहेत. प्राप्त माहिती नुसार हे दोन्ही परिसर फक्त ८०० मीटरच्या अंतरावर स्थित आहे. शाहरुख खानचे वडील ताज मुहम्मद खान यांचा जन्म ह्याच घरात झाला. वकील असणारे ताज मुहम्मद खान हे काँग्रेस समर्थक देखील होते.
सन १९४७ साली फाळणी झाल्यानंतर ताज मुहम्मद खान हे त्यांच्या संपूर्ण परिवाराला घेऊन भारतातल्या दिल्लीमध्ये स्थायिक झाले. शाहरुखने काही वर्षांपूर्वी पाकिस्तानात जाऊन ते घर बघितले देखील होते. आजही शाहरुखचे अनेक नातेवाईक पाकिस्तानात स्थायिक आहेत.
शाहरुखच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर शाहरुख लवकरच ‘पठाण’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. जवळपास २ वर्षांनंतर शाहरुख पडद्यावर दिसणार आहे. शिवाय शाहरुख आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ सिनेमातही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात पहिल्यांदाच बॉलिवूडचे तिन्ही खान एकत्र दिसणार आहे.