बॉलिवूडमधून एकापाठोपाठ एक कलाकार आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता पुन्हा एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्री आणि कॉमेडियन मल्लिका दुआ हिची आई चिन्ना दुआ यांचे निधन झाले आहे. त्या ५६ वर्षांच्या होत्या. त्या जवळपास एक महिन्यापासून कोरोना व्हायरसविरुद्ध झुंज देत होत्या. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर कलाकार दु:ख व्यक्त करत आहेत.
चिन्ना यांचे खरे नाव पद्मावती दुआ असे होते. त्या मित्रमंडळींमध्ये चिन्ना या नावाने प्रसिद्ध होत्या. विशेष म्हणजे चिन्ना या ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्या पत्नी होत्या.
बीना काकने केली पोस्ट
चिन्ना यांच्या निधनावर अभिनेत्री आणि राजकीय नेत्या बीना काक यांनी इंस्टाग्रामवर त्यांचा फोटो शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे. बीना यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “प्रिय चिन्ना, तू खूप संघर्ष केला. आता तुझ्या आत्म्याला शांती मिळो. खूप खूप प्रेम.”
कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिली होती माहिती
मागील महिन्यात म्हणजेच १५ मे रोजी चिन्ना यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवरून कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती दिली होती. त्यांनी लिहिले होते की, “सर्वांना नमस्कार. मला श्वास घेण्यास समस्या येत होती. माझा आवाज ऐकून डॉक्टरांनी देखरेखीची आवश्यकता असल्याचे सांगितले. मला १३ मे रोजी सेंट स्टीफेन्स रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तब्येतीत सुधारणा झाली नाही. आयसीयूची आवश्यकता होती, परंतु तिथे बेड नव्हता. काल रात्री मी मेदांता रुग्णालयात दाखल झाले. विनोद खोलीत ऑक्सिजनवर आहेत. बरे होण्यास वेळ लागेल. सर्वांच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे.”
यानंतर चिन्ना यांनी आपल्या तब्येतीची माहितीही दिली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










