Wednesday, January 15, 2025
Home कॅलेंडर कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

मधुबालापासून ते आजच्या दीपिका पदुकोणपर्यंत बॉलिवूडला अतिशय सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रीची देन लाभली आहे. या इंडस्ट्रीच्या प्रत्येक दशकाने एक सुपरस्टार होताना पाहिला आहे. हिंदी सिनेसृष्टीच्या 80/90 च्या काळात माधुरी दीक्षित, श्रीदेवी या इंडस्ट्रीवर राज्य करत होत्या. उत्तम डान्स आणि सशक्त अभिनय करणाऱ्या या दोघींच्या स्टारडमला टक्कर देण्याचा अनेकींनी प्रयत्न केला. मात्र, त्या या प्रयत्नात अयशस्वीच झाल्या. यातच करिश्मा कपूर या अभिनेत्रीनी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला, जिने या दोघींना ना केवळ डान्स तर अभिनय आणि सौंदर्यात देखील जोरदार यशस्वी टक्कर दिली. अशात आज रविवारी (दि. 25 जुन)ला करिश्मा कपूर तिचा 49वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील रंजक प्रवास…

बॉलिवूडमधील सर्वात मोठे आणि कलेची परंपरा असलेले घराणे म्हणजे कपूर घराणे होय. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरु झालेली ही परंपरा आज रणबीर कपूरपर्यंत अविरत चालू आहे. याच कपूर घराण्यातल्या चौथ्या पिढीत जन्मलेल्या करिश्मा कपूरने अभिनय करण्याचे ठरवल्यावर सर्वानाच थोडा धक्का बसला. कारण कपूर घराण्याची अशी परंपरा होती की, या घराण्यातील मुली अभिनय क्षेत्रात काम करणार नाही. मात्र करिश्माने हा नियम मोडत या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले.

सन 1991 मध्ये ‘प्रेमकैदी’ सिनेमातून अभिनेता हरीश कुमारसोबत करिश्मा कपूरने अभिनयात पदार्पण केले. करिश्माने तिच्या पहिल्याच सिनेमात स्विम सूट घालून खळबळ माजवली होती. जेव्हा करिश्माने या इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली तेव्हा, इतर अभिनेत्रींच्या तुलनेत करिश्माचे लुक्स आणि वेशभूषा खूपच कमजोर होती. यावरून तिच्यावर खूप टीका झाली. मात्र करिश्माने स्वतःला ग्रूमिंग करायला सुरुवात केली आणि एक सुंदर अभिनेत्री म्हणून तिचा प्रवास सुरु झाला. उत्कृष्ट अभिनयाचा वारसा तिला तिच्या घरातूनच मिळाला होता. करिश्माने एका पेक्षा एक सरस सिनेमे केले.

करिश्मा कपूरने ‘प्रेमकैदी’ नंतर ‘अनारी’, ‘अंदाज अपना अपना’ असे काही सिनेमे केले. या सिनेमांनंतर 1996 साली आला चित्रपट ‘राजा हिंदुस्थानी’. आमिर खानसोबत या सिनेमातून करिश्माचे एक वेगळे आणि मोहक रूप सर्वाना पाहायला मिळाले. पाच वर्षांमध्ये करिश्माने स्वतःमध्ये खूप बदल केले होते. हा सिनेमा तुफान गाजला. या सिनेमातील करिश्मा आणि आमिर खानचा सर्वात लांब किसिंग सीनदेखील खूप चर्चांमध्ये आला. या चित्रपटाने करिश्माला एक स्टार बनवले. यानंतर ती यशाच्या पायऱ्या चढतच गेली.

करिश्माची सर्वात जास्त आणि चांगली जोडी जमली ती गोविंदासोबत. करिश्मा आणि गोविंदा ही जोडी सिनेमा हिट करण्याचे जणू समीकरणच बनले. ‘हीरो नंबर वन’, ‘कुली नंबर वन’, ‘साजन चले ससुराल’, ‘हसीना मान जाएगी’, ‘राजा बाबू’, ‘खुद्दार’, ‘मुकाबला’, ‘प्रेम शक्ती’ आदी हिट सिनेमे दिले. या जोडीला प्रेक्षक प्रेमाने ‘चीची-लोलो’ म्हणायचे. 1997साली आलेल्या ‘दिल तो पागल हैं’ सिनेमासाठी करिश्माला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यासोबतच तिला अनेक मनाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

चित्रपटांबद्दल नेहमीच नशीबवान राहिलेली करिश्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यात अजिबात नशीबवान ठरली नाही. करिश्मा सतत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मीडियामध्ये चर्चेचा मुद्दा ठरली. ती आणि अभिनेत्री रविना टंडन यांच्यातला वाद देखील तुफान गाजला. भांडणाचा मुद्दा होता अभिनेता अजय देवगण. अजयचे रवीना आणि करिश्मासोबत अफेअर होते. सुरुवातीला अजय आणि रवीना नात्यात होते. त्यांनी ‘गैर’, ‘दिलवाले’, ‘एक ही रास्ता’, ‘जंग’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्यात अनेक वर्षं प्रेमप्रकरण सुरू होते. पण अजयच्या आयुष्यात करिश्मा कपूरची एन्ट्री झाली आणि त्याने रवीनासोबत ब्रेकअप केले. या ब्रेकअपमुळे रवीनाने डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्येचा प्रयत्न देखील केला असल्याचे म्हटले जाते.

करिश्माला ‘दिल तो पागल हैं’ सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. पण तुम्हाला माहित आहे का? की या सिनेमातील करिश्माच्या भूमिकेसाठी पहिली चॉइस करिश्मा नव्हती, तर ही भूमिका यश चोप्रा यांनी जुही चावलाला ऑफर केली होती. मात्र माधुरीसोबत सहायक भूमिका करायला जुही तयार नसल्याने, हा रोल करिश्माला मिळाला आणि तिने या संधीचे सोने करत राष्ट्रीय पुरस्कार पटकावला.

करिश्मा कपूरचे अजय देवगणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती अभिषेक बच्चनसोबत नात्यात होती. या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. जया बच्चन यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये करिश्माची ओळख सून म्हणून देखील करून दिली होती. मात्र मधेच माशी शिंकली यांनी या दोघांचा साखरपुडा तुटला. जया बच्चन यांची अशी इच्छा होती की, करिश्माने लग्नानंतर सिनेमांमध्ये काम करू नये. मात्र, ही अट करिश्माचा आई बबिता यांना मान्य नव्हती. म्हणूनच यांचे नाते तुटल्याचे बोलले जाते.

त्यानंतर करिश्माने 2002मध्ये दिल्लीच्या एका मोठ्या उद्योगपतीसोबत संजय कपूरसोबत लग्न केले. मात्र लग्नानंतर करिश्माला अनेक त्रास सहन करावे लागले. म्हणून तिने घटस्फोट घेण्याचे ठरवले. 2016साली या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर करिश्माने संजय आणि त्याच्या परिवाराबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. या लग्नातून तिला समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत.

सध्या करिश्मा मोठ्या पडद्यापासून लांब असून ती जाहिराती आणि वेबसिरीजमध्ये आपल्याला दिसते. करिश्माने चित्रपटांमध्ये पुनरागमन केले होते मात्र त्यात तिला यश मिळाले नाही. (karishma kapoor birthday special interesting facts about karishma kapoor career and personal life)

अधिक वाचा-
‘पाऊस अन् उन्हाळा…’ अक्षय कुलकर्णीची ‘ती’ पाेस्ट चर्चेत
प्रेग्नेंसीमध्ये खुललं इशिता दत्ताचं साैंदर्य, अभिनेत्रीचे सुंदर फाेटाे एकदा पाहाच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा