सध्या मराठी मनोरंजन विश्वात, विषेशतः मालिका विश्वात अनेक वाहिन्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळतेय. या स्पर्धांमध्ये आपल्याला विविध वाहिन्यांवर नवनवीन कथानकं असणाऱ्या मालिका पाहायला मिळतात.
जोपर्यंत एखाद्या मालिकेचा टीआरपी वाहिनीला नफा मिळवून देत आहे, तोपर्यंत ती मालिका त्या वाहिनीवर दाखवली जाते.(या टीआरपी प्रकरणावर आपण एका विशेष लेखात बोलूयात.) तर गमावलेला टीआरपी मिळवण्यासाठी वाहिनी नवनवीन मालिका आणत असते.
अशाच दोन नव्या मालिका आपल्याला नव्या वर्षात पाहायला मिळणार आहेत. दोन विविध वाहिन्यांवर येणाऱ्या या मालिका त्यांच्या नावांवरून प्रेक्षकांची अधिकच उत्सुकता वाढवत आहेत. कोणत्या आहेत या दोन मालिका चला पाहुयात.
सून सासू सून(स्टार प्रवाह)
गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनी ही टीआरपीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील क्रमांक १ ची वाहिनी ठरली आहे. टीआरपी स्पर्धेत सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या टॉप ५ मालिका ह्या स्टार प्रवाहच्याच आहेत. सध्या सगळीकडेच स्टार प्रवाहची चर्चा असल्याने ही वाहिनी सून सासू सून ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहे.
ही मालिका एक रिऍलिटी शो प्रकारातील कार्यक्रम असणार आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री हा महाराष्ट्रातील घराघरात जाऊन सासू आणि सुनेच्या नात्याची मधुर बाजू उलगडून दाखवणार आहे. ११ जानेवारी २०२१ पासून ही मालिका सायंकाळी ५.३० वाजता स्टार प्रवाह वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
येऊ कशी तशी मी नांदायला (झी मराठी)
झी मराठी ही गेली अनेक वर्षे महाराष्ट्राची क्रमांक १ ची वाहिनी राहिली आहे. या वाहिनीचं वैशिष्ट्य हे की मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात पहिली खाजगी मनोरंजन वाहिनी म्हणून झी मराठीकडे पाहिलं जातं. याच वाहिनीवर आता या महिन्यात एक नवी मालिका येऊ घातली आहे. या मालिकेचं नाव आहे येऊ कशी तशी मी नांदायला!
या मालिकेमध्ये आपल्याला सासू सुनेच्या नात्याची खट्याळ आणि मिश्किल बाजू पाहायला मिळणार आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती केतकर, शाल्व किंजवडेकर, अन्विता फलटणकर हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ही मालिका ४ जानेवारी २०२१ पासून रात्री ८ वाजता झी मराठीवर आपल्याला पाहायला मिळतेय.