बॉलिवूडमध्ये कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या लग्नाची घाई सुरु असताना, टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये देखील अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाच्या लगबग दिसून येत आहे. मागील काही काळापासून सतत अंकिता आणि विक्की त्यांच्या लग्नामुळे प्रकाशझोतात आहे. आता या दोघांच्या लग्नाआधी होणाऱ्या सर्व विधींना सुरुवात झाली आहे. १४ डिसेंबर रोजी अंकिता आणि विकी विवाहबंधनात अडकणार आहे. या विधींचे काही फोटो अंकिता आणि विकीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले असून, काही काळातच ते तुफान व्हायरल झाले आहेत.
या दोघांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये अंकिताचा महाराष्ट्रीय लूक चांगलाच भाव खाऊन जात आहे. अंकिताने हिरव्या रंगाची गुलाबी काठ असलेली साडी नेसली असून, त्यावर गळ्यात भारदस्त नेकलेस, मोठे कानातले, नाकात नाथ, हातात हिरवा चुडा घातला आहे. मात्र तिच्या लूकमध्ये सर्वात जास्त लक्षवेधी ठरत आहे, तिने बांधलेल्या मुंडावळ्या. तिच्या या लूकवर तिच्या फॅन्स एकापेक्षा एक भारी कमेंट्स देत आहेत. तर दुसरीकडे विकीने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तो कुर्ता-पायजमा घालून कपाळावर मुंडावळ्या बांधून घेताना दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये अंकिता आणि विकी सोबत दिसत असून, दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे.
अंकिताने तिचा फोटो शेअर करताना तिच्या भावना फक्त एका शब्दातच व्यक्त केल्या आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “पवित्र”, तर विकीने त्याच्या फोटोंना चक्क मराठीमध्ये कॅप्शन दिले असून, त्याने लिहिले की, “मी आमच्यावर प्रेम करतो but “पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त…” त्याच्या कॅप्शनचा अर्थ स्पष्ट आहे की, आता तर विधी सुरु झाले आहेत, लग्न अजून बाकी आहे.
अंकिताने तिच्या लग्नादी बॅचलर पार्टीसुद्धा दिली होती, ज्यात तिच्या सर्व मैत्रिणींनी हजेरी लावली होती. अंकिता आणि विकी यांनी २०१९ पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. त्याआधी अंकिता सुशांतसिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र २०१६ साली त्यांचे ब्रेकअप झाले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा