Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड ईडीने ताब्यात घेतलेल्या जॅकलिन फर्नांडिसला मिळाली परदेशात जाण्याची परवानगी

ईडीने ताब्यात घेतलेल्या जॅकलिन फर्नांडिसला मिळाली परदेशात जाण्याची परवानगी

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandes) हिच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील अडचणी संपताना दिसत नाहीत. रविवारी (५ डिसेंबर) जॅकलिनला मुंबई विमानतळावर ताब्यात घेतल्यानंतर सोडण्यात आले. जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात ईडीने लुक आऊट नोटीस जारी केली होती, त्यामुळे तिला विमानतळावर थांबवण्यात आले होते. नंतर तिला देशाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली.

जॅकलिनला चौकशीसाठी दिल्लीत ईडीसमोर हजर रहावे लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तिच्याविरुद्ध ईडी लवकरच नवीन समन्स जारी करणार आहे. जॅकलिनचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकले असून, याप्रकरणी ईडीच्या पथकाने तिची चौकशीही केली आहे. अलिकडेच जॅकलिनने ईडीसमोर तिचा जबाब नोंदवला होता.

नक्की काय आहे प्रकरण?

सुकेश चंद्रशेखर यांच्या २०० कोटींच्या वसुली प्रकरणात जॅकलिनचा जबाब ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए)’ अंतर्गत नोंदवण्यात आला. या प्रकरणात जॅकलिन साक्षीदार आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाला होता का याचा तपास एजन्सी करत आहे.

द-बँग कॉन्सर्टमध्ये जॅकलिन

यावेळी, ईडीने जॅकलिनसाठी एक लुक आऊट परिपत्रक जारी केले होते, त्यानुसार ती मुंबई सोडून कुठेही जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत ती आज (६ डिसेंबर) मुंबईहून परदेशात जात असताना विमानतळ कर्मचाऱ्यांनी तिला अडवले. १० डिसेंबर रोजी रियाधमध्ये होणाऱ्या ‘द-बँग’ कॉन्सर्टमध्ये जॅकलिन सहभागी होणाऱ्या टीमचा एक भाग आहे, ती या कॉन्सर्टच्या संदर्भात देशाबाहेर जाण्याची तयारी करत असेल.

सुकेश चंद्रशेखर यांच्यावर २० हून अधिक आहेत गुन्हे दाखल

दिल्लीच्या रोहिणी तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांच्यावर एका वर्षभरात एका व्यावसायिकाकडून २०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर खंडणीचे २० हून अधिक गुन्हे दाखल असून, कारागृहातून त्यांनी रॅकेट चालवले आहे. मूळची श्रीलंकेची असलेली जॅकलिन बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या जवळची मानली जाते. जॅकलिनचे वडील श्रीलंकेचे आहेत, तर आई मलेशियाची आहे. जॅकलिनचे वडील संगीतकार आहेत आणि आई एअर होस्टेस होती. चार भावंडांमध्ये जॅकलिन सर्वात लहान आहे. जॅकलिनला एक मोठी बहीण आणि २ मोठे भाऊ आहेत.

हे देखील वाचा