‘राधे श्याम’ (Radhe Shyam) अभिनेता प्रभास (Prabhas) हा जनतेचा तारणहार म्हणून समोर आला आहे. कारण त्याने आंध्र प्रदेशातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीला मदत केली आहे. तब्बल १ कोटी रुपयांची देणगी त्याने या निधीला दिली आहे. नुकतेच तिरुपती आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक लोक प्रभावित झाले. हैदराबादमधील विनाशकारी पाऊस आणि एप्रिल २०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान देखील, अभिनेत्याने ४.५ कोटी रुपयांची देणगी दिली.
मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आंध्र प्रदेशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. अशा परिस्थितीत पीडितांना मदतीचा हात पुढे करताना प्रभासने एक कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. प्रभासच्या या पावलामुळे त्याचे चाहते खूप खूश आहेत.

प्रभासच्या आधी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या वतीने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये २५-२५ लाख रुपये दान केले आहेत. ‘राधे श्याम’ अभिनेत्यापूर्वी सुपरस्टार चिरंजीवी, त्याचा मुलगा आणि कलाकार राम चरण, ज्युनियर एनटीआर, महेश बाबू आणि अल्लू अर्जुन आदी अनेक कलाकारांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना दान दिले. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी प्रभावित लोकांना मदत केल्याने त्यांच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. या कलाकारांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर प्रभास लवकरच त्याच्या आगामी ‘राधे श्याम’ या चित्रपटात पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट १४ जानेवारी २०२२ रोजी संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रभास एक अशी व्यक्तिरेखा साकारत आहे जी त्याने यापूर्वी कधीही साकारली नव्हती. विशेष म्हणजे प्रभासचे चाहते त्याचा चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
चित्रपटाची दोन गाणीही प्रदर्शित झाली आहेत. ‘आशिकी आ गई’ या गाण्यात प्रभास आणि पूजाची रोमँटिक लव्हस्टोरी पाहायला मिळते, तर ‘सोच लिया’ हे गाणे दोन तुटलेल्या हृदयांच्या वेदनांची कहाणी सांगते. या चित्रपटातील गाण्यांनी चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता वाढवली आहे. आता तो फक्त या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. या चित्रपटाशिवाय प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपटही प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचे शूटींग संपले आहे, मात्र त्याची प्रदर्शन डेट अजून जाहीर झालेली नाही.
हेही वाचा-
रस्त्यावर लोकांना थांबवून थांबवून फुलं देताना दिसला कार्तिक आर्यन, पण काय आहे कारण?
BIGG BOSS 15: राखी सावंतच्या पतीने केला मोठा खुलासा, स्वतः च्या भूतकाळाबद्दल सांगितले ‘असे’ काही










