मागील काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये बालकलाकारांना मोठे महत्व प्राप्त झाले आहे. काही सिनेमे तर बालकलाकारांना आणि लहान मुलांना डोळ्यासमोर ठेऊनच लिहिले जातात. मराठीमध्ये देखील असे अनेक सिनेमे आहेत, ज्यांची कथा याच बालकलाकारांच्या अवतीभोवती फिरते. बालकलाकारांच्या भूमिका करणारे कलाकार मोठे झाल्यावर पुन्हा अभिनयाकडे वळतात असे नाही. काही कलाकार अभिनयातच त्यांचे करिअर घडवतात तर काही करिअरच्या दृष्टीने वेगळ्या क्षेत्राला प्राधान्य देतात. कधी कधी तर असेही घडते, बालकलाकार म्हणून एखादा कलाकार तुफान गाजतो, मात्र मोठे झाल्यावर मुख्य भूमिकेत किंवा या क्षेत्रात त्यांना यश मिळत नाही, आणि तर कालांतराने गायब होतात. मराठीमधील अतिशय गाजलेला सिनेमा म्हणजे ‘दे धक्का.’ मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर यांच्या भूमिका असलेल्या या सिनेमाने तुफान यश मिळवले. प्रत्येक कलाकाराच्या जिवंत अभिनयामुळे या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या सिनेमात या कलाकारांव्यतिरिक्त सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य हे दोन बालकलाकार देखील होते. सक्षम या सिनेमानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या समोर आला, मात्र गौरी जास्त दिसलीच नाही. दे धक्का या मोठ्या सिनेमात काम केल्यानंतर ही शुक्राची चांदणी जणू या क्षेत्रातून गायबच झाली. आज या लेखातून जाणून घेऊया गौरीबद्दल अधिक माहिती.

‘दे धक्का’ हा चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील “उगवली शुक्राची चांदणी” हे गाणे तर तुफान गाजले. या गाण्यासोबतच हे गाणे जिच्यावर चित्रित झाले होते ती बालकलाकार “गौरी वैद्य” देखील तेव्हा खूपच लोकप्रिय झाली. गौरीने ‘दे धक्का’ चित्रपटात मकरंद अनासपुरेच्या मुलीची सायलीची तर सक्षम कुलकर्णीने सायलीच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन १३ वर्षे लोटली मात्र चित्रपटातील इतर कलाकारांप्रमाणे गौरी पुढे कुठेच जास्त दिसली नाही.

गौरी वैद्य ही अभिनेत्री आता २६ वर्षांची झाली असून, तिने मुंबईत माटुंगा इथल्या ‘डी. जी. रुपारेल’ महाविद्यालयामधून शिक्षण पूर्ण करत इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी’मधून पदवी घेतली आहे. ‘दे धक्का’ चित्रपटानंतर गौरी महेश मांजेरकरांच्या ‘शिक्षणाचा आयचो घो’ या चित्रपटात सक्षमच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली. या सिनेमात तिच्यासोबत भरत जाधव मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर २०११ मध्ये ‘एकापेक्षा एक जोडीचा मामला’ या रियॅलिटी शोमध्ये तिने सक्षमसोबत सहभाग घेतला होता. पुढे गौरी तामिळ चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या आणि २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘आवाहन’ चित्रपटात दिसली.
हेही वाचा :










