Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड राजबिंडा अभिनेता म्हणून ओळख मिळवलेल्या शशी कपूर यांनी विसाव्या वर्षी केले होते 5 वर्ष मोठ्या जेनिफरसोबत लग्न

राजबिंडा अभिनेता म्हणून ओळख मिळवलेल्या शशी कपूर यांनी विसाव्या वर्षी केले होते 5 वर्ष मोठ्या जेनिफरसोबत लग्न

बॉलिवूडचे सर्वात चार्मिंग आणि हँडसम अभिनेते शशी कपूर यांची शनिवारी (दि. 18 मार्च) रोजी जयंती आहे. शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च, 1938 ला हिंदी सिनेसृष्टीतल्या सर्वात मोठ्या कपूर घराण्यात झाला होता. पृथ्वीराज कपूर यांचा सर्वात लहान मुलगा म्हणून शशी कपूर हे सुरुवातीला ओळखले जायचे. मात्र, हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करून त्यांनी त्यांच्या अभिनयाने स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. 60, 70, 80 चे दशक आपल्या अभिनयाने त्यांनी तुफान गाजवले.

शशी कपूर (Shashi Kapoor) यांचे खरे नाव बलबीरराज कपूर हे होते. आपल्या भावंडांमध्ये शशी हे सर्वात लहान होते. शम्मी कपूर, राज कपूर, उर्मिला कपूर, नंदी देवी आणि देवी कपूर ही त्यांची भावंडे. त्यांनी 1948 साली आलेल्या राज कपूर दिग्दर्शित ‘आग’ या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी ‘आवारा’, ‘संग्राम’, ‘दाना पानी’ अनेक सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. त्याच्या आईला बलबीरराज हे नाव आवडत नसल्याने त्या त्यांना शशी म्हणूनच हाक मारायच्या. पुढे त्यांनी इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागल्यानंतर हेच नाव ठेवायला सुरुवात केली.

करियरच्या सुरुवातीला त्यांनी सुनील दुत्त, राज कपूर यांच्यासारख्या बड्या कलाकारांच्या चित्रपटांमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. 1961 साली त्यांनी ‘धर्मपुत्र’ या सिनेमातून मुख्य नायक म्हणून काम करत मोठ्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये जवळपास 166 चित्रपटांमध्ये काम केले. त्यातील 61 चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य नायक म्हणून काम केले, 55 मल्टीस्टारर सिनेमांमध्ये त्यांनी काम केले, 21 चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका, तर 7 चित्रपटांमध्ये त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली. शशी हे त्यांच्या काळातील पहिले असे अभिनेते होते ज्यांनी इंग्लिश चित्रपटांमध्ये काम केले.

‘दीवार’, ‘कभी कभी’, ‘जब जब फुल खिले’, ‘नमक हलाल’, ‘सिलसिला’, ‘शान’, ‘सुहाग’, ‘त्रिशूल’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘कन्यादान’, ‘हसीना मान जायेगी’, ‘कलयुग’, ‘फकिरा’, ‘सिंदूर’, ‘प्यार किये जाय’ आदी अनेक चित्रपटांमधून त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. चित्रपटांसोबतच शशी नाटकांमध्ये देखील खूप सक्रिय होते. त्यांच्या वडिलांच्याच पृथ्वी थिएटरमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केले. नाटकांनीच शशी यांच्या आयुष्याला वैयक्तिकरीत्या सुखद कलाटणी दिली.

शशी कपूर यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे सहाय्यक दिग्दर्शक होण्याआधी बराच काळ नाटकांना दिला. अभिनेते झाल्यानंतरही ते पृथ्वी थिएटरमध्ये जात. याच थिएटरचे ते मॅनेजर देखील होते. एकदा नाटकाच्या वेळी त्यांची आणि जेनिफर यांची ओळख झाली आणि त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. शशी कपूर यांनी त्यांच्या पुस्तकात ‘पृथ्वीवालाज’मध्ये त्यांच्या आणि जेनिफर यांच्या भेटीचा एक प्रसंग सांगितला आहे.

ते म्हणतात, “मी जेनिफरची बरीच नाटकं पाहिली. पण तिने कधीच माझ्याकडे लक्ष दिले नाही. काही दिवसांनंतर तिने मला सांगितले की, ‘मी मुंबईमध्येच राहते आणि आपण भेटू शकतो.’” त्यानंतर शशी आणि जेनिफर वरचेवर भेटू लागले. जेनिफर या शशी यांच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठ्या होत्या. शशी कपूर यांनी त्यांच्या पुस्तकात असे देखील लिहिले आहे की, जेनिफरयांच्यासोबत वेळ घालवायला मिळावा म्हणून ते मुंबई लोकलमधून प्रवास करत असताना नेहमी एक स्टेशन पुढे उतरायचे.

त्यांनी त्यांच्या पुस्तकात अजून एक किस्सा लिहिला आहे. “मी टीनएजर असताना, खूपच लाजाळू होतो. मी जेनिफर यांच्याशी बोलतानाही फार लाजायचो आणि त्यामुळे जेनिफर मला ‘गे’ समजू लागली होती. मला हे तिने नंतर सांगितले की, तिला मी गे वाटायचो. पण परिस्थिती बदलत गेली, आणि मग आमचे प्रेम लग्नापर्यंत पोहोचले.” ज्यावेळी शशी कपूर जेनिफर यांच्या प्रेमात पडले त्यावेळी ते केवळ 18 वर्षांचे होते. त्यांचे प्रेम खरे होते. त्यांच्या लग्नाला सर्वांचा खूप विरोध झाला होता. खासकरून जेनिफर यांच्या वडिलांचा या लग्नाला खूप विरोध होता. मात्र, असे असूनही, त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी 25 वर्षाच्या जेनिफरसोबत लग्न केले. त्यांना कुणाल, करण, संजना अशी तीन मुले आहेत.

लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या आयुष्यात अशी वेळ आली की त्यांना काम मिळणे बंद झाले. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली होती. यातून मार्ग काढताना त्यांना त्यांची आवडती स्पोर्टस कार देखील विकावी लागली, तर जेनिफर यांनी सुद्धा त्यांचे काही मौल्यवान सामान विकले होते. पुढे शशी कपूर यांचा अभिनेत्री नंदा यांच्याबरोबरचा ‘फूल खिले’ हा चित्रपट आला आणि तो सुपरहिट ठरला. अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. त्याकाळातल्या सर्वच अभिनेत्रींंसोबत त्यांनी काम केले होते. रोमँटिक हिरो आणि देखणे असल्याने ते अनेक तरुणींच्या गळ्यातले ताईत बनले.

त्यांच्यासाठी 1982 साल खूप त्रासदायक ठरले. त्यावर्षी जेनिफर यांना कॅन्सर झाल्याचे समजले आणि पुढच्या दोनच वर्षात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. जेनिफर यांच्या निधनानंतर शशीजी खूप एकटे झाले. आपल्या पत्नीच्या आठवणीत त्यांनी त्यांचे उरलेले जीवन व्यतीत केले. वयाच्या 79व्या वर्षी 2017 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राजबिंडा अभिनेता म्हणून त्यांना ओळख मिळाली होती. शशी यांना त्यांच्या अभिनयातील अमूल्य योगदानामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यात फिल्मफेअरसोबत ‘राष्ट्रपती पुरस्कार’, ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्कारांचा समावेश आहे. (shashi kapoor facts lets know about his love story)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
बाबो! रागाने लाल झालेले शशी कपूर शत्रुघ्न सिन्हा यांच्या मागे चक्क पट्टा घेऊन धावले होते; वाचा तो किस्सा
…आणि शशी कपूर यांनी पूनम ढिल्लोच्या खाडकन वाजवली कानाखाली, उपस्थित लोकं फक्त पाहतच राहिले

हे देखील वाचा