महाराष्ट्र राज्याला लोककलेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रात अनेक थोर कलावंत नाटककार आणि शाहीर होऊन गेले ज्यांनी आपल्या कलेने अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यांपैकी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजलेले नाव म्हणजे शाहीर साबळे. आपल्या पहाडी आवाजाने शाहीर साबळे यांनी असंख्य पोवाडे गायले. त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाच्या माध्यामातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले. रविवारी (२० मार्च) शाहीर साबळे यांचा स्मृतिदिन. याच निमित्ताने त्यांचे नातू केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे, ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.
शाहीर साबळे हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. महाराष्ट्राची लोकधारा, जय जय महाराष्ट्र अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून शाहीर साबळे यांनी आपल्या आवाजाची छाप पाडली होती. आता त्यांचा हा सगळा जीवन प्रवास, संघर्ष रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे करणार आहेत. याविषयीची पोस्ट त्यांनी आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.
केदार शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय की, “बाबा (शाहीर साबळे) आज तुमचा स्मृतिदिन.. आणि हे तुमचं जन्मशताब्दी वर्ष, पुढच्या पिढीला कळावं की, कोण शाहीर साबळे होते? आणि मुळात शाहीर म्हणजे काय? यासाठी माझा हा प्रयत्न. येत्या १ मे २०२२ रोजी या चित्रपटाविषयी आणखी महत्वपूर्ण घोषणा करणार आहे. रसिकांनी तुमच्यावर आतोनात प्रेम केल. पण आता पिढी बदलली आहे. पण या पिढीचे वडिलधारी त्यांना नक्कीच सांगतील की, शाहीर साबळे काय होते, तुमचाच, केदार.” असे म्हणत १ मे रोजी मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, केदार शिंदे लवकरच ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून आपल्या आजोबांचा जीवन प्रवास दाखविणार आहेत. ते गेले अडीच ते तीन वर्षापासुन या चित्रपटाचे काम करत असून, याची पटकथा आणि संवाद लेखन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले आहे. सध्या त्यांच्या या आगामी घोषणेची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –