Saturday, April 20, 2024

ऋषी कपूर यांच्या आधी, ‘या’ कलाकारांच्या मृत्यूनंतर इतर कलाकारांनी पूर्ण केलेत चित्रपट; वाचा यादी

‘शर्मा जी नमकीन’ चित्रपटाचा ट्रेलर काही काळापूर्वीच प्रदर्शित झाला. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. ऋषी कपूर यांचे निधन झाले, तेव्हा ते या चित्रपटाचे शूटिंग करत होते. अशा परिस्थितीत त्यांच्या जाण्यानंतर या चित्रपटातील अनेक सीन सेव्ह झाले, ज्यांचे चित्रीकरण बाकी होते. ऋषी कपूर यांच्यानंतर परेश रावल (Paresh Rawal) यांनी या चित्रपटाच्या उर्वरित सीनचे शूटिंग पूर्ण केले, त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. मात्र, ही काही पहिलीच वेळ नाही आहे की, बॉलिवूड स्टारच्या मृत्यूनंतर त्याचे चित्रपट दुसऱ्या स्टारने पूर्ण केले आहेत. चला तर मग त्या कलाकारांबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्या मृत्युनंतर त्यांचे चित्रपट इतर कलाकारांनी पूर्ण केले आहेत.

दिव्या भारती – श्रीदेवी
एका अपघातात १९९३ साली आपला जीव गमावलेली अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) ‘लाडला’ चित्रपटाची मुख्य नायिका होती. या चित्रपटाचे ८० टक्के शूटिंग तिच्यासोबत पूर्ण झाले होते. मात्र चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच तिचे निधन झाले. त्यानंतर श्रीदेवी (Sridevi) या भूमिकेसाठी निर्मात्यांची दुसरी पसंती बनल्या आणि त्यांच्यासोबत पुन्हा चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले.

दिव्या भारती – रंभा
दिव्या भारती तिच्या काळातील सर्वात लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री होती. तिचे निधन झाल्यावर अनेक चित्रपटांचे शूटिंग ठप्प झाले. त्यात ‘ठोली मुद्धू’ या तेलगू चित्रपटाचाही समावेश होता. दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर या चित्रपटात रंभाने (Rambha) जागा घेतली.

दिव्या भारती – रवीना टंडन
अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनील शेट्टी (Suniel Shetty), रवीना टंडन (Raveena Tandon), नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांसारख्या बड्या कलाकारांनी सजलेला ‘मोहरा’ चित्रपट कोण विसरू शकेल. या चित्रपटातील अक्षय आणि रवीना यांच्यावर चित्रित केलेले ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे आजही चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, या चित्रपटासाठी रवीनाला नंतर कास्ट करण्यात आले होते. तिच्या आधी या चित्रपटाची मुख्य नायिका दिव्या भारती होती. चित्रपटाचे पाच दिवस शूटिंग पूर्ण करूनच दिव्याने या जगाचा निरोप घेतला.

दिव्या भारती – जुही चावला
दिव्या भारतीने १९९५ मध्ये आलेल्या ‘कर्तव्य’ चित्रपटाचे ३० टक्के शूटिंग पूर्ण केले होते. मात्र त्यांच्या निधनानंतर या चित्रपटात जुही चावलाला (Juhi Chawla) कास्ट करण्यात आले.

गुरु दत्त- धर्मेंद्र
गुरुदत्त (Gurudutt) यांनी १९६४ मध्ये या जगाचा निरोप घेतला. मृत्यूपूर्वी ते १९६६ मध्ये आलेल्या ‘बहारे फिर भी आएगी’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. पण गुरुदत्त यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांची भूमिका बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र (Dharmendra) यांना देण्यात आली.

ओम पुरी – ऋषी कपूर
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी २०१८ मध्ये आलेल्या ‘मंटो’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार होते. पण शूटिंगच्या दिवसातच त्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर ही भूमिका ऋषी कपूर यांनी साकारली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा