Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

तब्बल २४ फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर ‘हा’ अभिनेता करणार होता आसाममध्ये चहाच्या मळ्यात काम, पण…

शम्मी कपूर हे हिंदी सिनेमातील असे नाव आहे, ज्यांच्या नावाशिवाय हिंदी चित्रपटांचा इतिहास अपूर्णच आहे. आपल्या अनोख्या अदा, डान्स आणि रोमँटिक अंदाज यांमुळे हजारो तरुणींना त्यांनी त्याकाळी घायाळ केले. शमशेर राज कपूर उर्फ शम्मी कपूर यांची मस्त कलंदर, खुशाल अशी प्रतिमा होती. त्यांनी गंभीर भूमिका फारशा केल्याच नाहीत. शम्मी यांची आगळेवेगळी आणि भन्नाट नृत्यशैली ही त्यांची ओळख आहे. शम्मी यांचा जन्म जरी कपूर घराण्यात झाला असला तरी त्यांना या क्षेत्रात जम बसवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला.

१९५३ मध्ये आलेला पहिला चित्रपट ‘जीवन ज्योती’पासून ते १९५७ मध्ये आलेला ‘कॉफी हाऊस’पर्यंत शम्मी यांनी सलग २५ सिनेमे फ्लॉप दिले, म्हणून त्यांनी हे क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता. अपयशाने खचलेल्या शम्मी यांनी चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम ठोकून आसाममध्ये चहाच्या मळ्याचे व्यवस्थापक म्हणून काम करण्याची तयारी केली. मात्र त्याच वेळी त्यांना ‘तुमसा नही देखा’ या सिनेमाने त्यांना तारले. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले. शम्मी यांच्या प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफदेखील प्रचंड गाजली.

शम्मी कपूर यांनी त्यांच्या आयुष्यात दोन लग्न केले. शम्मी यांनी वयाच्या २३ व्या वर्षीच अभिनेत्री गीता बाली यांच्याशी लग्न केले. ह्या दोघांची पहिली भेट ‘कॉफी हाउस’ सिनेमाच्या सेटवर झाली. त्यानंतर त्यांनी केदार शर्मा यांच्या १९५९ साली आलेल्या ‘रंगीन राते’ सिनेमात सोबत काम केले. त्यावेळी या सिनेमाची शूटिंग रानीखेत येथे चालू होती. तिथेच शम्मी आणि गीता यांच्यात मैत्री झाली. काही काळाने शम्मी गीता यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर शम्मी यांनी त्यांच्या भावना गीता यांना बोलावून दाखवल्या. पण गीता यांनी त्यांना नकार दिला.

शम्मी यांनी एकही क्षण असा जाऊ दिला नाही की त्यांनी गीता यांना लग्नाचे विचारले नाही. मात्र गीता त्यांना सतत नकार दिला. एकदिवस शम्मी यांनी गीता यांना पुन्हा लग्नासाठी विचारले. त्यांनी त्यादिवशी त्यांना होकार दिला आणि लगेच आपण लग्न करू असे सांगितले. आता लगेच लग्न करण्यासाठी त्यांनी थेट मंदिर गाठले आणि मंदिरात लग्न केले. तेव्हा शम्मी आणि गीता यांच्याजवळ सिंदूर देखील नव्हता, अशावेळी गीता यांनी पटकन त्यांच्या पर्समधून लिपस्टिक काढून दिली. त्याच लिपस्टिकने शम्मी यांनी गीता यांची मांग भरली.

लग्नानंतर शम्मी व गीता आनंदात संसार करू लागलेत. त्यांना आदित्य आणि कांचन ही दोन मुलेही झालीत. मात्र १९६५ मध्ये वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी गीता बाली यांचे निधन झाले होते. पत्नीच्या निधनाने शम्मी कपूर कोलमडून गेले होते. त्यांनी स्वत:कडे लक्ष देणे सोडून दिले होते. त्यामुळे त्यांचे वजन खूप वाढले. वाढलेल्या वजनामुळे हीरो म्हणून त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली आणि हळूहळू त्यांना चित्रपट मिळणे बंद झाले.

मुलं लहान असल्याने त्यांच्या घरच्यांनी शम्मी यांच्यावर दुस-या लग्नासाठी दबाव टाकणे सुरु केले. नीला देवीसोबत शम्मी यांनी लग्न करावे, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. पण शम्मी कपूर तयारच होत नव्हते. घरच्यांचा दबाव इतका होता की, अखेर शम्मी कपूर दुस-या लग्नासाठी तयार झालेत. पण काही अटींवर. शम्मी यांनी नीला देवींसमोर दोन अटी ठेवल्या. पहिली अट होती मंदिरात लग्न करण्याची आणि दुसरी अट होती, नीला देवींनी कधीही आई न होण्याची. नीला देवींनी या दोन्ही अटी मान्य केल्या. नीला देवी कधीच आई बनल्या नाहीत. शम्मी कपूर व गीता बाली यांच्या मुलांना त्यांनी आपलेसे केले.

शम्मी कपूरचे संगणक प्रेम एवढे होते की ते त्या काळात वेगवेगळे सॉफ्टवेअर विकत घ्यायचे. अगदी शेवटच्या काळापर्यंत ते संगणकाच्या माध्यमातून रसिकांच्या संपर्कात होते. त्यांच्या याहू गाण्याने प्रेरित होऊनच याहू हे संकेतस्थळ त्याच नावाने उदयास आले. काही वर्षांपूर्वी या संकेतस्थळाच्या मुंबई येथील कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यास शम्मी कपूर उपस्थित होते. इंटरनेट युझर क्लब ऑफ इंडियाचे ते चेअरमन होते.

 

हे देखील वाचा