मराठी टेलिव्हिजनवर अनेक नव्या कथा घेऊन मालिका येत आहेत. काही कथा केवळ मनोरंजनासाठी आहेत, तर काही कथा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांची जाणीव करून देणाऱ्या आहेत. अशातच कलर्स मराठीवर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नवीन मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रोमो पाहता ही कहाणी वास्तविक घटनेवर आधारित असल्याचे दिसून येत आहे. या नवीन मालिकेचे नाव आहे ‘आई मायेचं कवच’ प्रोमोमध्ये एका आई आणि मुलीची कहाणी दिसत आहे.
या मालिकेत अभिनेत्री भार्गवी चिरमुले दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे अनेक मालिका आणि चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी ही अभिनेत्री या मालिकेत एका तरुण मुलीच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. मालिकेत भार्गवी एका नोकरी करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. एकीकडे संसार, नोकरी आणि दुसरीकडे मुलीच्या भविष्याची काळजी अशा भावनिक अवस्थेत ती दिसत आहे. मुलीसाठी ती सगळं करताना दिसत आहे. परंतु दुसरीकडे तिची मुलगी मात्र कॉलेजच्या नावाखाली बाहेर फिरताना दिसत आहे. प्रोमो पाहून मालिका काहीतरी भन्नाट असणार आहे याची कल्पना आली आहे. (Aai mayech kavach new serial will on colors Marathi)
कलर्स मराठीने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “तुम्ही तुमच्या मुलांना किती ओळखता? आजच्या धकाधकीच्या आयुष्यात हा प्रश्न कित्येक पालकांना पडलेला दिसतो. या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता उलगडला जाणार आई मुलीचं नातं. पाहूया नवीन गोष्ट. ‘आई मायेचं कवच’ २७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर.”
या व्हिडिओवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच अनेकजण ही मालिका आणि भार्गवी चिरमुलेला टेलिव्हिजनवर पाहायला उत्सुक आहेत.