अनेक वर्षे अभिनयात सक्रिय असूनही कधी सापडले नाहीत वादात, वाचा अरुण बालींचा प्रवास


टीव्ही आणि चित्रपटांचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (Arun Bali) यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि टीव्ही शो केले आहेत. त्यांनी केवळ हिंदी चित्रपटातच काम केले नाही, तर तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अरुण यांनी त्यांच्या कारकिर्दीत बहुतांश व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांनी बॉलिवूडमधील सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अरुण अनेक टीव्ही शोमध्ये दिसले होते.

छोट्या पडद्यावरील प्रवास
अरुण यांचा जन्म २३ डिसेंबर १९४२ रोजी पाकिस्तानमधील लाहोर येथे झाला. अरुण यांनी १९८९ मध्ये टीव्ही शो ‘दूसरा केवल’मधून टीव्हीमध्ये पदार्पण केले. त्याचवर्षी ते ‘फिर वही तलाश’ या शोमध्येही दिसले होते. लोकप्रिय टीव्ही शो ‘नीम का पेड’ मधील त्यांची व्यक्तिरेखा खूप पसंत केली गेली. १९९१ मध्ये त्यांनी ‘चाणक्य’ या मालिकेत राजा पोरसची भूमिका साकारली. त्यांनी दूरदर्शनच्या ‘स्वाभिमान’ या लोकप्रिय शोमध्ये कुंवर सिंगची भूमिका साकारली होती. २००० मध्ये त्यांना ‘कुमकुम’ या मालिकेची ऑफर आली होती. यामध्ये त्यांनी हर्षवर्धन वाधवाची भूमिका साकारून घराघरात आपला ठसा उमटवला. ‘वो रहेने वाली महल की’, ‘आहट’, ‘शक्तिमान’, ‘मायका’, ‘देख भाई देख’ आणि ‘जय गणेश’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

मोठ्या पडद्यावरील प्रवास
अरुण यांनी १९९१ मध्ये ‘सौगंध’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अक्षय कुमारनेही या चित्रपटाद्वारे अभिनय विश्वात पदार्पण केले. या चित्रपटात अरुण यांनी अभिनेता पंकज धीर यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्यांचे काम पसंत केले गेले. यानंतर त्यांनी ९० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या. ‘खलनायक’, ‘आ गले लग जा’, ‘शिकारी’, ‘हे राम’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘दंड नायक’, ‘आँखे’, ‘अरमान’, ‘३ इडियट्स’, ‘खलनायक’, ‘पीके’, ‘रेडी’, ‘बर्फी’, ‘ओह माय गॉड’, ‘केदारनाथ’ या चित्रपटांमध्ये काम केले.

पानिपथ’मध्ये दिसले शेवटचे
अरुण सध्या फार कमी चित्रपट किंवा टीव्ही शोमध्ये दिसतात. त्यांनी आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत ५० हून अधिक चित्रपट आणि ३० हून अधिक टीव्ही शो केले आहेत. २०१९ मध्ये ‘पानिपथ’ चित्रपटात अला सिंगची भूमिका साकारली होती. यानंतर ते कोणत्याही चित्रपटात दिसले नाहीत.

अरुण यांचा आवडता अभिनेता जितेंद्र आणि त्यांची आवडती अभिनेत्री श्रीदेवी आहे. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांची गाणी त्यांना खूप आवडतात. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अरुण कधीही वादात सापडले नाहीत. अरुण यांना एक मुलगा आणि तीन मुली अशी चार मुले आहेत. प्रत्येकजण विवाहित आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!