Wednesday, July 3, 2024

बापरे! हेमा मालिनी व जितेंद्र यांचं लग्न होणारचं होतं, पण तेवढ्यात दारु पिऊन तिथं धर्मेंद्र पोहचले

मरीन ड्राईव्ह हे मुंबईतील असे ठिकाण आहे, जिथे असंख्य प्रेमीयुगूलांनी आपल्या प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. काहींच्या या प्रेमकहाण्या पुढे गेल्या तर काहींना पुढे जाऊन प्रेमभंग पाहावा लागला. आजही अनेक प्रेमवीर  मुंबईतील सर्वांच्या लाडक्या ठिकाणाला भेट देत असतात. काही सेलिब्रेटीही इकडे सकाळी किंवा संध्याकाळी फेरफटका मारायला येतात. मुंबई शहरात येणारा प्रत्येकजण एकदा तरी या ठिकाणी भेट देण्याचं स्वप्न पाहात असतो. असंच एकदा मरिन ड्राईव्हला फिरायला आलेल्या मुलीशी एका सुपरस्टारने पुढे लग्न केले, असं जर तुम्हाला सांगितलं तर विश्वास नाही बसणार ना? जरी तुमचा विश्वास बसणार नसला तरी मंडळी हे खरं आहे. ते घडलं कधी तर थेट 80 च्या दशकात. चला तर मंडळी आज आपण जाणून घेऊयात, मरिन ड्राईव्हवर एका पोरीला चने मारल्यामुळे जुळलेली बॉलीवूडमधील फिल्मी वाटणारी खरीखुरी प्रेमकहानी आणि त्याच सुपरस्टारची इतर अभिनेत्रींबरोबरची अफेअर्स.

बॉलीवूडमध्ये आजपर्यंत जे काही सुपरस्टार झाले किंवा आहेत, त्यातील एक मोठ्ठं नाव म्हणजे सुपरस्टार जितेंद्र. पंजाबमधील अमृतसर येथे जन्म झालेल्या जितेंद्र यांचे खरे नाव रवी कपूर. 1959 साली वयाच्या 27 व्या वर्षी आपला पहिला सिनेमा केलेल्या जितेंद्र यांचा फिल्मी प्रवास खूपच खास राहिला आहे. त्याबद्दल आपण कधीतरी बोलूयाच. परंतू आजचा विषय आहे जितेंद्र यांचे प्रेम, अफेअर्स व लग्न.

शोभा कपूर ज्यांना आपण जितेंद्र यांच्या पत्नी म्हणून ओळखतो, त्यांची व जितेंद्र यांची ओळख शोभा केवळ 14 वर्षांच्या असताना झाली होती. हा काळ असा होता जेव्हा जितेंद्र हे चित्रपटात आपले स्थान पक्के करण्यासाठी प्रचंड स्ट्रगल करत होते. अशाच वेळी शोभा त्यांच्या जीवनात आल्या.

अशी झाली होती शोभा कपूर यांच्याशी ओळख
झाले असे, एक दिवस जितेंद्र त्यांच्या मित्रांसह मरीन ड्राईव्हला फिरायला गेले होते. अशावेळी मित्रासोबत ते चणे खात होते. तेवढ्यात एक सुंदर मुलगी तिथून जात होती. जितेंद्र यांच्या मित्रांना तेव्हा त्या मुलीची मज्जा करण्याची लहर आली व त्यांची तिच्याकडे काही चणे फेकले. शेवटी मित्र हे जितेंद्र यांचे होते. मित्रांचे पाहून जितेंद्र यांनाही लहर आली व त्यांनीही तिच्याकडे एक दोन चणे फेकले. यामुळे वैतागलेल्या त्या मुलीला प्रचंड राग आला. तिचा राग शांत करण्यासाठी जितेंद्र तिच्या मागे-मागे गेले. तिच्या मागे मागे जाणे हे आपल्याला आयुष्यभरासाठी पुरेल याचा जितेंद्र यांनी तेव्हा विचारही केला नव्हता. ती मुलगी म्हणजेच ज्यांच्या नावाने आज बॉलीवूडमध्ये मोठे प्रोडक्शन हाऊस आहे, त्या शोभा कपूर होय. त्यांनी पुढे ब्रिटीश एअरवेजमध्ये एअर होस्टेसची नोकरीही केली.

हा तर आपण त्यांच्या भेटण्यापर्यंत आलो होतो. तर पुढे त्यांच्यात भेटणे वाढू लागले. त्या दोघांत तेव्हा हळू हळू मैत्री वाढू लागली. पुढे मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. ते जवळपास 1972 पर्यंत प्रेमाच्या नात्यात अडकले होते. खरे पाहाता त्यांचे लग्न हे 1973 सालीच होणार होते, परंतू लग्नाच्या एक दिवस आधी जितेंद्र यांचे वडील आजारी पडले व त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. लग्नामुळे शोभा यांनी आपली नोकरी सोडली होती. परंतू आता त्यांना लग्नासाठी वाट पाहावी लागणार होती. यामुळे काही काळ त्या डिप्रेशनमध्ये देखील गेल्या होत्या.

माझा सिनेमा रिलीझ होऊ दे आपण लगेच लग्न करु
१९७४ साली आलेला विदाई हा चित्रपट प्रदर्शित होताच आपण लग्न करु, असे वचनच जितेंद्र यांनी शोभा यांना दिले होते. त्यांनी ते पाळले देखील. 9 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता व 31 ऑक्टोबर रोजी त्यांनी शोभा यांच्याशी लग्न केले. लग्नाच्या दिवशी त्यांनी सकाळीच आपल्या पालकांना याची माहिती दिली. त्यावेळी त्यांची आई ही जपानला होती. घरच्यांची लग्न मोठ्या पद्धतीने करण्याची इच्छा होती परंतू त्याच दिवशी लग्न करायचे असल्याने त्यांना फारशी तयारी करता आली नाही. राजीव कपूर, संजीव कपूर व गुलझार यांच्यासह अगदी जवळच्या मित्रांच्या व नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांनी आपले लग्न अतिशय साध्या पद्धतीने केले.

अन् हेमा-जीतूचे लग्न होता होता राहिले
जेव्हा शोभा या ब्रिटीश एअरवेजमध्ये काम करत होत्या, तेव्हा त्यांना नेहमी जितेंद्रच्या अफेअरच्या बातम्या येत असे. अगदी हेमा मालिनीपासून ते जया प्रदापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत त्यांचे नाव जोडले गेले. एकेवेळी जितेंद्र यांचे शोभा यांच्याशी व हेमा यांचे धर्मेंद्र यांच्याशी बिनसले होते. याच काळात जीतूजी व हेमाजी जवळ येत होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. त्यांच्या लग्नाचे सर्वकाही सुरु होते. चेन्नई शहरात हे लग्न होत होते. परंतू लग्नाला न बोलवलेल्या एका सुपरस्टार पाहुण्याने लग्नात येऊन राडा केला. हा पाहुणा म्हणजे त्यावेळी प्रचंड दारु पिऊन लग्नात पोहचलेला धर्मेंद्र.

हेमा मालिनी यांच्या घरचे धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या प्रेमप्रकरणामुळे फारसे खुश नव्हते. ते हेमाचे लग्न अन्य कुणाशी तरी लावून देण्यासाठी उत्सुक होते. अशावेळी हेमा व जीतू यांच्यात चांगली मैत्री होती. यामुळे हेमाच्या परिवाराने जीतूच्या घरच्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. यासाठी हेमा मालिनी यांच्या आई जया यांनी त्यांची समजूत काढली. हेमा मालिनी देखील यासाठी राजी झाल्या. अखेर अतिशय सिक्रेट पद्धतीने हे लग्न चेन्नई येथे करण्याचा निर्णय झाला. याची कुणालाही खबरबात नव्हती.

थेट दारु पिऊन गाठले हेमाचे घर
परंतू याचा सुगावा माध्यमांना लागला व एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीमुळे ही गोष्ट धर्मेंद्र यांना समजली. त्यांनीही त्यांच्याप्रमाणेच प्रेमभंग होत असलेल्या शोभा यांची भेट घेतली व त्यांना घेऊन थेट चेन्नई गाठले. जेव्हा चेन्नईतील हेमामालिनी यांच्या घरी ते पोहचले, तेव्हा हेमा मालिनींच्या वडीलांनी रागाने धर्मेंद्र यांच्याकडे पाहिले व त्यांच्यापासून दुर राहायला सांगितले. तसेच त्यांचे लग्न झाल्यामुळे ते आपली मुलगी धर्मेंद्र यांना देणार नसल्याचेही सांगितले. अखेर खूप वेळा सांगूनही त्यांनी हेमा यांचे घर सोडले नाही व शेवटी त्यांना हेमा मालिनी यांच्याशी बोलण्याची परवानगी दिली. यावेळी सर्वजण बाहेर वाट पाहात होते.

प्रेम शेवटी प्रेम असतं
थोड्या वेळा हेमा मालिनी बाहेर आल्या व आपल्याला या लग्नासाठी थोडा वेळ घ्यावा लागेल असे सांगितले. परंतू जितेंद्र यांच्या घरच्यांनी हेमाला तीचे उत्तर लगेच देण्यासाठी सांगितले. यावर तीने नकार दिला. यामुळे जितेंद्र यांच्या घरचे चांगलेच वैतागले. जितेंद्र यांनाही हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी लगेच ते घर सोडले व पालकांसोबत तडक मुंबई गाठले. पुढे त्यांनी आपली आधीची प्रेयसी शोभा कपूर यांच्याशी लग्न केले. त्यांना तुषार कपूर व एकता कपूर ही दोन मुले आहेत. तर हेमा मालिनी व धर्मेंद्र यांना एहना व इशा देओल या दोन मुली आहेत.

लग्नानंतर आयुष्यात आलं श्रीदेवी नावाच वादळ
लग्नानंतरही जितेंद्र यांचे नाव श्रीदेवी यांच्याशी जोडले गेले होते. सिनेमे चालत नसल्यामुळे जितेंद्र तेव्हा दाक्षिणात्य सिनेमांत काम करत होते. अशा वेळी त्यांची सहकलाकार म्हणून अनेक सिनेमांत श्रीदेवी दिसत होत्या. त्यांनीच श्रीदेवी यांना एक कलाकार म्हणून मुंबई नगरीत आणले होते. यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. परंतू या चर्चांना थांबविण्यासाठी जितेंद्र यांनी आपल्या घरातच मुलांसोबत एक फॅमिली फोटोशुट केला होता. या काळात शोभा कपूर प्रचंड वैतागल्या होत्या व त्यांनी जितेंद्र यांना मुलांसोबत त्या घर सोडून जाण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांनी अतिशय शांतपणे श्रीदेवी यांच्याही समजूत काढली होती. जितेंद्र यांची मुलगी एकताने तर एकदा सांगितले होते की तिला तिच्या शाळेतील मुले वडिलींच्या श्रीदेवीबरोबच्या अफेअरबद्दल विचारत असे. त्यावर त्यांनी होय उत्तर देत तुमचे वडिल फक्त अशी स्वप्न पाहू शकतात, असे उत्तर मुलांना दिले होते. यानंतर जितेंद्र यांना परिवारावर होणारा परिणाम लक्षात आला व त्यांनी श्रीदेवी यांच्याबरोबरची मैत्री संपवली.

दुसरी श्रीदेवी बॉलीवूडला दिली
त्यानंतर त्यांचे नाव आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत जोडले जाऊ लागले. ती अभिनेत्री म्हणजे जया प्रदा. अनेकजण तेव्हा असे म्हणायचे की त्यांनी केवळ श्रीदेवीला दाखविण्यासाठीच जया प्रदाला दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतून हिंदीत आणले होते. अनेकजण असेही म्हणत होते, की जया प्रदा या जितेंद्र यांच्यासाठी वेड्या होत्या परंतू जितेंद्र जया प्रदांसाठी अजिबात गंभीर नव्हते.

अखेर 1983 साली आलेल्या मवाली सिनेमात जितेंद्र, श्रीदेवी व जया प्रदा हे तिघेही एकत्र दिसले. हा सिनेमा पुढे सुपरहिट झाला परंतू शुटिंगवेळी जया प्रदा व श्रीदेवी एकमेकांकडे पाहात देखील नव्हत्या.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
करीनाच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक लीक; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
‘धक धक गर्ल’चे आई बनल्यानंतर बदलले आयुष्य; म्हणाली, ‘घरी बसून…’

हे देखील वाचा