oriहिंदी चित्रपटसृष्टीचे शोमॅन आणि प्रसिद्ध अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक राज कपूर (Raj Kapoor) यांच्या चित्रपटांचे चाहते आजही प्रचंड प्रमाणात आहे. वडील पृथ्वी कपूर (prithvi kapoor) यांच्याप्रमाणेच राज कपूर यांचेही हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान अवर्णनीय आहे. राज कपूर यांनी वयाच्या १७ व्या वर्षी रणजीत मुव्हीकॉम आणि बॉम्बे टॉकीज फिल्म प्रोडक्शन कंपनीमध्ये स्पॉट बॉय म्हणून काम करायला सुरुवात केली. अभिनयाचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून आणि या प्रोडक्शनकडून मिळाला, म्हणून ते काम करत असलेल्या निर्मिती संस्थेकडून ‘नीलकमल’ या चित्रपटासाठी त्यांना साइन केले गेले. राज कपूर यांची मंगळवारी (१४ डिसेंबर) ९७वी जयंती आहे.
राज यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी पेशावर, पाकिस्तान येथे झाला. ते स्पॉटबॉय म्हणून काम करत होते. केदार शर्मा या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात जेव्हा ते क्लॅपर बॉय म्हणून काम करत होते तेव्हा राज यांनी एकदा इतक्या जोरात टाळी वाजवली की, नायकाची नकली दाढी टाळीमध्ये अडकली. या प्रकारावर केदार शर्मा संतापले आणि त्यांनी राज यांना जोरदार चापट मारली. मात्र यानंतर केदार शर्मा यांनीच राज यांना त्यांच्या ‘नीलकमल’ चित्रपटात मुख्य भूमिकेत कास्ट केले होते.
राज कपूर यांनी संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचे रंग पसरवले. त्यांच्या अजरामर चित्रपटांमध्ये ‘मेरा नाम जोकर’, ‘श्री ४२०’, ‘आवारा’, ‘बेवफा’, ‘आशियाना’, ‘अंबर’, ‘अनहोनी’, ‘पापी’, ‘आह’, ‘धुन’, ‘बूट पॉलिश’ या चित्रपटांचा समावेश आहे. राज यांना १९७१ मध्ये त्यांच्या चित्रपटसृष्टीतील असाधारण योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८७ मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
चित्रपटांव्यतिरिक्त राज कपूर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होते. त्यांची अभिनेत्रीसोबतची प्रेमकहाणी देखील चांगलीच गाजली होती. ‘आरके फिल्म्स’च्या बॅनरखाली बनलेल्या पहिल्या चित्रपटात राज आणि नर्गिस मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचे नाव होते ‘आग’. यानंतर दोघांनी एकत्र १६ चित्रपट केले. बहुतेक चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, ९ वर्षे राज-नर्गिसची जोडी पडद्यावर हिट राहिली.
राज यांचा मुलगा ऋषी कपूर (rushi kapoor) यांनी त्यांच्या आत्मचरित्र ‘खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अनसेन्सर्ड’ यात अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, “माझे वडील राज कपूर २८ वर्षांचे होते आणि तेव्हाच त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शोमॅन’ची पदवी मिळाली होती. त्यावेळेस ते सुद्धा प्रेमात पडले होते, दुर्दैवाने माझ्या आईशिवाय दुसऱ्या कोणाच्यातरी. ‘आग’, ‘बरसात’ आणि ‘आवारा’ या त्यांच्या काही हिट चित्रपटांमध्ये त्यांची गर्लफ्रेंडच चित्रपटाची नायिका होती.” ऋषी यांनी एका ठिकाणी लिहिले की, नर्गिसला इन-हाऊस नायिका म्हटले जायचे आणि आरके स्टुडिओच्या चिन्हात तिचाही समावेश आहे. ऋषी यांनी लिहिले की, त्यांचे वडील दारू, चित्रपट आणि आघाडीच्या महिलांच्या प्रेमात होते.
७० हून अधिक चित्रपटात केले काम
राज हे असे व्यक्ती होते, ज्यांच्यापासून संपूर्ण चित्रपटसृष्टी प्रेरणा घेत असे. त्यांना फिरती फिल्म लायब्ररी म्हटले जायचे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ७० हून अधिक चित्रपट केले आणि अनेक पुरस्कार जिंकले. त्यांनी बनवलेले चित्रपट आजही चित्रपटसृष्टीसाठी उदाहरणं आहेत आणि त्यांच्या काही चित्रपटांचे संगीत आजही लोकप्रिय आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक नवीन गोष्टी आणल्या आणि प्रत्येक नवीन सुरुवातीचा पर्याय बनले. साहजिकच या कारणासाठी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘शोमॅन’ म्हटले जाते.
शेवटचा चित्रपट होता ‘हिना’
‘हिना’ हा राज कपूर यांचा शेवटचा चित्रपट होता. १९८८ मध्ये त्यांच्या निधनामुळे हा चित्रपट अपूर्ण राहिला. तो रणधीर कपूर यांनी पूर्ण केला आणि तो प्रदर्शित होऊन एक प्रचंड व्यावसायिक यश सिद्ध झाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :
- तब्बल २० मिनिटे नर्गिसच्या हिल्सकडे पाहत राहिले होते राज कपूर, म्हणाले ‘मला त्या दिवशी समजले’
- अधुरी प्रेम कहाणी! नर्गिस दत्त यांच्या लग्नाची बातमी समजल्यानंतर राज कपूर स्वतःलाच देऊ लागले होते सिगारेटचे चटके
- जेव्हा ‘या’ अभिनेत्याच्या लग्नाच्या वरातीत एकत्र पोहचले राज कपूर-दिलीप कुमार, अनसीन फोटो व्हायरल