Friday, April 25, 2025
Home मराठी लय भारी, ‘वेड’ लावी! अखेर जिनिलिया देशमुखचे मराठी सिनेसृष्टीत, तर रितेशचे दिग्दर्शनात पदार्पण

लय भारी, ‘वेड’ लावी! अखेर जिनिलिया देशमुखचे मराठी सिनेसृष्टीत, तर रितेशचे दिग्दर्शनात पदार्पण

मराठी इंडस्ट्रीमध्ये मागील काही वर्षांपासून खूपच मोठा बदल झाला आहे. चित्रपटांचे विषय, कलाकारांचा प्रभावी अभिनय, संगीत सर्वच बाजुंनी मराठी सिनेसृष्टी अधिकच संपन्न होत आहे. हेच कारण आहे की, मराठीची भुरळ बॉलीवूडला देखील पडताना दिसत असून, अनेक मोठमोठे कलाकार मराठीमध्ये काम करत आहे, किंवा काम करण्यास उत्सुक आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात क्युट आणि लोकप्रिय कपल म्हणून रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांना ओळखले जाते. जेव्हा या दोघांचे लग्न झाले त्यानंतर नेहमी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये जिनिलियाला ती मराठीत कधी काम करणार हा प्रश्न विचारला जात होता. परंतु मधल्या काळात मुलांना वेळ देण्यासाठी तिने स्वतःला चित्रपटांपासून दूर ठेवले होते. काही दिवसांपूर्वीच रितेशने तो लवकरच त्याच्या आगामी मराठीच सिनेमाची घोषणा करणार असल्याचे सांगितले. अखेर ती घोषणा त्याने केली आहे. यासोबतच सर्वांना एक सरप्राईज देखील दिले आहे.

रितेशने नुकतीच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या आगामी दिग्दर्शकीय सिनेमाची घोषणा केली असून, यासोबतच जिनिलिया या सिनेमात अभिनय करत मराठीमध्ये पदार्पण करत असल्याचे जाहीर केले आहे. १० वर्षांनी जिनिलिया पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पदार्पण करत असून, यासाठी तिने चक्क मराठी चित्रपटाची निवड केली आहे. जिनिलियाने तिच्या या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले असून, या चित्रपटाचे नाव ‘वेड’ असे आहे. यासोबतच तिने तिच्या या पहिल्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाल्याचा एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे.

यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “मागील काही वर्षात मी अनेक भाषेतील चित्रपटात काम केले. त्यात तुम्हा सर्वांचे मला आशीर्वादरुपी आदर आणि प्रेम मिळाले. माझा जन्म महाराष्ट्रात झाल्यामुळे मराठी चित्रपट करण्याची इच्छा अनेक वर्ष माझ्या मनात होती. तशी एखादी स्क्रिप्ट मिळावी, असेही मला नेहमी वाटत होते. आज अखेर तो दिवस आला. माझा पहिला मराठी चित्रपट…, मी तब्बल १० वर्षांनी अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण करत आहे. हे स्वप्नवत आहे. तर दुसरीकडे माझा नवरा रितेश देशमुख हा पहिल्यांदाच दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मी या चित्रपटात अभिनेत्री जिया शंकरसोबत पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे मी तुमच्या प्रत्येकाकडून नम्रपणे आशीर्वादाची विनंती करत आहे. कारण प्रत्येक चित्रपट हा नेहमीच एक प्रवास असतो आणि या संपूर्ण प्रवासात तुम्ही आमच्यासोबत असाल तर आम्हाला नक्की आवडेल,” या पूर्वी जेनेलियाने हिंदी, तेलगू , तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तर रितेश देशमुखने ट्विट करत लिहिले, “20 वर्ष कॅमेऱ्यासमोर काम केल्यानंतर आता मी पहिल्यांदाच कॅमेऱ्यामागे उभे राहण्याची मोठी झेप घेतली आहे. माझा पहिला मराठी सिनेमा दिग्दर्शित करत असताना मला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हवे आहेत. माझ्या या प्रवासाचे साक्षीदार व्हा, ‘वेड’ सिनेमाचा भाग व्हा.” मुंबई फिल्म कंपनीने आज ६ व्या मराठी चित्रपटाची घोषणा केली.

या सिनेमात जिया शंकर देखील मुख्य भूमिकेत असून, अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. हा सिनेमा पुढच्यावर्षी १२ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा- 

हे देखील वाचा