Saturday, June 29, 2024

मेल्यानंतरही ‘या’ कलाकारांनी ओतला अभिनयात जीव, शेवटची झलक पाहण्यासाठी गच्च भरलेले थिएटर

असं म्हणतात ना की, माणसं त्यांच्या कामामुळे मोठी होतात. शेवटी शरिर नष्ट झालं तरी त्या माणसाचं व्यक्तिमत्त्व त्याच्या कामामुळे नेहमीच जिवंत राहातं. आणि याचसाठी तर प्रत्येकाचा अट्टाहास असतो. हे सर्व सांगण्याचा उद्देश हाच की, मित्रांनो बॉलिवूडमध्येही असे अनेक कलाकार झाले, जे आता या जगात नाही, पण त्यांच्या चित्रपटांमुळे ते नेहमीच आपल्या लक्षात राहतात. यातील काही कलाकार तर असे आहेत, ज्यांचे काही चित्रपट त्यांच्या निधनानंतर रिलीज झाले, म्हणजे त्यांनी चित्रपटाचे शूट पूर्ण केले होते, पण ते हयात असताना तो चित्रपट रिलीज झाला नाही, तर ते गेल्यानंतर तो चित्रपट पडद्यावर आला. या लेखातून आपण त्याच कलाकारांवर नजर टाकणार आहोत, ज्यांचे चित्रपट त्यांच्या निधनानंतर रिलीज झाले.

सुशांत सिंग राजपूत
जेव्हा अशा कलाकारांबद्दल विषय निघतो, तेव्हा आपल्याला सध्या चकटन आठवतो तो सुशांत सिंग राजपूत. २०२० मध्ये १४ जून रोजी सुशांतचे निधन झाले. तो वांद्र्यातील त्याच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याचवेळी भारतात कोरोनामुळे लॉकडाऊनचा काळ सुरू होता. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट पुढे गेल्या होत्या. तर, काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत होते. आशातच त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपटच्या थेटर रिलीजलाही स्थगिती द्यावी लागली होती, पण अखेर सुशांतच्या जाण्यानंतर २४ जुलै २०२२ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला.

ओम पुरी
आपल्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते म्हणजे ओम पुरी. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे ६ जानेवारी, २०१७ रोजी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. निधन होण्याच्या एक महिन्यापूर्वीच त्यांनी ट्यूबलाईट या चित्रपटासाठी शूटिंग पूर्ण केले होते. त्यामुेळे त्यांच्या निधनानंतर २५ जून, २०१७ रोजी हा चित्रपट रिलीज झाला.

राजेश खन्ना
या यादीत राजेश खन्नाही आहेत. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या राजेश खन्ना यांचे १८ जुलै, २०१२ रोजी कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले. मात्र, त्यांनी काम केलेला रियासत हा चित्रपट त्यांच्या निधनानंतर जवळपास २ वर्षांनी म्हणजेच २०१४ मध्ये रिलीज झाला. शम्मी कपूर यांचाही अखेरचा चित्रपट त्यांच्या निधनानंतर रिलीज झाला. त्यांनी रॉकस्टार या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून काम केले होते, पण हा चित्रपट नोव्हेंबर २०११ मध्ये रिलीज झाला. त्याच्या आधी १४ ऑगस्ट, २०११ रोजी शम्मी कपूर यांचे निधन झाले होते.

संजीव कुमार
बरं मंडळी शोले चित्रपट आठवतोय का? आणि त्यातला ठाकूर? आठवत असेलच. तर याच अजरामर कलाकृती ठरलेल्या शोले चित्रपटात ठाकूरची भूमिका ज्यांनी केली ते संजीव कुमार यांचे ६ नोव्हेंबर, १९८५ रोजी वयाच्या ४७व्या वर्षी निधन झाले. त्यांना जन्मताच हृदयाचा त्रास होता. विशेष गोष्ट अशी की त्यांच्या निधनानंतर त्यांनी काम केलेले जवळपास १० पेक्षा जास्त चित्रपट रिलीज झाले. त्यांचा अखेरचा चित्रपट त्यांच्या निधनाच्या ८ वर्षांनंतर रिलीज झाला. तो चित्रपट होता प्रोफेसर की पडोसन. या चित्रपटाचे शूटील तीन चतुर्थांश झालेले असतानाच संजीव कुमार यांचे निधन झाले होते. त्यामुळे चित्रपटाच्या उत्तरार्धात त्यांची अनुपस्थिती दाखवण्यासाठी काहीसा बदल करण्यात आलेला.

मीना कुमारी
आता तुम्ही म्हणाल, असे केवळ अभिनेतेच आहेत का? तर नाही मित्रांनो या यादीत काही अभिनेत्रीही आहेत. ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मीना कुमारी ही पाकिजा चित्रपट केल्यानंतर खूप आजारी पडली होती. त्याच आजारात तिचा ३१ मार्च, १९७२ रोजी मृत्यू झाला. पण तिच्या निधनानंतर १९७२ मध्येच गोमती के किनारे हा चित्रपट रिलीज झाला.

मधूबाला
आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच नावाजली गेलेली अभिनेत्री म्हणजे मधूबाला. तिने अनेक चित्रपटांतून आपल्या सौंदर्याबरोबरच आपल्या सुंदर अभिनयाने अनेकांकडून दाद मिळवली होती, पण २३ फेब्रुवारी, १९६९ रोजी तिचे निधन झाले. तिच्या हृदयाला होल होते. पण तिच्या निझनानंतर तिचा ‘ज्वाला’ हा चित्रपट १९७१ मध्ये रिलीज झाला.

स्मिता पाटील
बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीत एक उत्तम अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या स्मिता पाटील यांनी कमी वयातच अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांचा मुलगा प्रतिक बब्बर याला जन्म दिल्यानंतर दोन आठवड्यांनी १३ डिसेंबर, १९८६ रोजी आपले प्राण गमावले. मात्र, असे असले तरी त्यांचे काही चित्रपट त्यांच्या निधनानंतर रिलीज झाले. त्यांचा अखेरचा ‘गलियों के बादशाह’ हा चित्रपट १७ मार्च, १९८९ रोजी रिलीज झाला.

दिव्या भारती
याच यादीत दिव्या भारतीचेही नाव येते. साल १९९३ मध्ये १९व्या वर्षी तिचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र, ज्याण्यापूर्वी तिने ‘शतरंज’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट तिच्या निधनानंतर नऊ महिन्यांनी रिलीज झाला होता. याबरोबर पहिली महिला सुपरस्टार म्हणून जिला ओळखले जाते, ती श्रीदेवी हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचे २४ फेब्रुवारी, २०१८ रोजी दुबईच्या एका हॉटेलमध्ये निधन झाले. तिच्या निधनानंतर तिने छोटीशी भूमिका केलेला झिरो हा चित्रपट तिच्या निधनानंतर २०१८ मध्ये रिलीज झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
शाहरुखच नाही, तर ‘या’ मराठी अभिनेत्यानेही अवलंबलाय सरोगसीमार्फत पालक होण्याचा मार्ग, मोठी आहे यादी
काळाच्या ओघात हरवलं ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचं सौंदर्य, ‘आशिकी’ फेम अभिनेत्रीचाही समावेश
एक- दोन लाखात खेळणाऱ्यातले नाहीत मांजरेकर, वाचा एका एपिसोडसाठी किती रुपये छापतात मराठी कलाकार

हे देखील वाचा