पंजाब राज्यात सध्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक मोठे मोठे उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. पंजाबमध्ये ११७ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. याच निवडणूकीच्या धामधुमीत अभिनेत्री माही गिलने (Mahie Gill) भाजपामध्ये प्रवेश केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री माही गिलने आपल्या दमदार अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीत जोरदार लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या घायाळ करणार्या सौंदर्याने चाहत्यांना ती नेहमीच मोहित करत असते. माहीने हिंदीसह अनेक पंजाबी चित्रपटात काम केले असून, तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. मात्र आता माहीने पंजाबी गायक हॉबी धालीवाल यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, भाजपचे केंद्रीयमंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि पंजाब भाजपा प्रदेशाध्यक्ष दुष्यंत गौतम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने ती राजकारणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माही गिलने मागच्या वर्षी कॉँग्रेस उमेदवार हर मोहिंदर सिंग लकीसाठी प्रचार केला होता. त्यावेळी राजकारणात येणार का असे विचारले असता तिने, “लकी माझा बालपणीचा मित्र असल्याने मी तिच्यासोबत आहे. मला राजकारणात रस नाही” अशी प्रतिक्रिया दिली होती. २००९ मध्ये आलेल्या ‘देव डी’ चित्रपटातून तिने आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने ‘गुलाल’, ‘आगे से राइट’, ‘दबंग’, ‘साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न’, ‘जंजीर’सारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे. चंदीगडमधून आलेल्या माहीचे खरे नाव रिंपी कौर गिल असे आहे. हिंदी आणि पंजाबी चित्रपटसृष्टी सह तामीळ चित्रपटातही काम करणार्या माहीने आपल्या दमदार अभिनयाने अनेक मोठमोठे अवॉर्डसुद्धा मिळवले आहेत.
आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टी गाजवणारी माही गिल राजकारण्याच्या रिंगणात काय कमाल करणार याचीच तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. माही आत्ता उमेदवार नसली तरी ती भाजपाचा जोरदार प्रचार करणार असल्याची बातमीही समोर आली आहे.
हेही वाचा :
‘माझे स्वप्न अपूर्ण राहिले’, लता दीदींबद्दल बोलताना ‘हा’ चित्रपट निर्माता भावूक
जेवढ्या चांगल्या सवयी तितका यशस्वी माणूस! असा होता लता मंगेशकर यांचा दिनक्रम
…म्हणून कॅटरिना कैफने थेट दाबला सलमान खानचा गळा, पाहा संपूर्ण व्हिडिओ










