Friday, March 29, 2024

पतीच्या निधनानंतर ‘या’ खास व्यक्तीने नीतूंना दिला सिनेमात कमबॅक करण्याचा सल्ला, स्वत:च केले स्पष्ट

बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी लग्नानंतर आपल्या कुटुंबाला महत्त्व दिले आणि अभिनयाकडे पाठ फिरवली. मात्र, त्यातल्या त्यात काही अभिनेत्री अशाही आहेत, ज्यांनी एक मोठा काळ कुटुंबाला दिल्यानंतर पुन्हा अभिनयाची वाट धरली आणि दमदार पुनरागमन केले. या अभिनेत्रींमध्ये आवर्जुन समावेश करावा अशा अभिनेत्री म्हणजे नीतू कपूर होय. नीतू बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्या करण जोहरच्या येत्या २४ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘जुग जुग जिओ’ या सिनेमातून पुनरागमन करणार आहेत.

पती ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या निधनानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी अचानक सिनेमात काम करण्याचा निर्णय का घेतला? असे अनेक प्रश्न चाहते विचारत आहेत. मात्र, यापूर्वीही त्या मुलगा रणबीर कपूर आणि पती ऋषी कपूर यांच्यासोबत बेशरम आणि काही मोजक्या सिनेमात झळकल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्याने चर्चेत आहेत.

अशातच नीतू यांनी स्वत: या प्रश्नाचे उत्तर दिले आहे की, नेमकं त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून सिनेमात पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत नीतू कपूर म्हणाल्या की, त्यांनी आपल्या मुलाच्या म्हणजेच रणबीर कपूर याच्या सांगण्यावरून पुन्हा सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ असा की, तो व्यक्ती रणबीरच होता, ज्याने ऋषी यांच्या निधनानंतर आई नीतू यांना पुन्हा काम सुरू करण्याचा सल्ला दिला होता.

मुलगा रणबीर कूपर याने दिलेला काम करण्याचा सल्ला
अभिनेत्री नीतू यांनी खुलासा केला की, जोपर्यंत रणबीर आणि रिद्धिमा यांनी वडिलांच्या निधनानंतर त्यांना पुन्हा काम सुरू करण्यास सांगितले नाही, तोपर्यंत त्यांनी कधीच असा विचार केला नव्हता की, त्या अभिनयात पुनरागमन करतील. नीतूंच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कधीच कामावर परतण्याचा विचार केला नव्हता.

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कुटुंबाला बसला होता धक्का
माध्यमांतील वृत्तानुसार नीतू म्हणाल्या की, “खरं तर हा सल्ला रणबीरचा होता. जेव्हा माझ्या पतीचे निधन झाले, तेव्हा आम्ही सर्व खूप दुःखी होतो आणि आम्हाला काय चालले आहे हे माहित नव्हते. दरम्यान, करण (जोहर) आणि रणबीर माझ्या घरी जेवायला आले होते, माझी दोन मुलं रिद्धिमा आणि रणबीर पुढे काय करायचं यावर बोलत होते. मी म्हणाले, ‘काय करावं तेही कळत नाहीये.’ मी कुठलाही सिनेमा करेल असं कधीच वाटलं नव्हतं. रणबीरने मी पुन्हा कामाला लागण्याचा सल्ला दिला, त्यावेळी हे सर्व कसे होईल हे मला माहित नव्हते.”

करण जोहरने दिली जुग जुग जिओची स्क्रिप्ट
नीतू कपूर यांनी पुढे बोलताना सांगितले की, कशाप्रकारे करण जोहरने त्यांना जुग जुग जिओ सिनेमाची स्क्रिप्ट दिली. तसेच, त्या कशाप्रकारे प्रभावित झाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “तेथे उपस्थित असलेल्या करणने सांगितले की, मी तुमच्यासाठी स्क्रिप्ट तयार करणार आहे. तो दुसऱ्या दिवशी एका दिग्दर्शकासोबत आला आणि त्याने मला स्क्रिप्ट दिली. मी स्क्रिप्ट वाचली आणि मला ती इतकी आवडली की मी त्याला हो म्हटलं.”

नीतू कपूर यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात वयाच्या सहाव्या वर्षी ‘सूरज’ या सिनेमातून केली होती. त्यांनी आतापर्यंत ६०हून अधिक सिनेमात काम केले आहे. त्यातील प्रसिद्ध सिनेमांमध्ये ‘अमर अकबर अँथनी’, ‘काला पत्थर’, ‘धरमवीर’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा