Monday, July 1, 2024

पुजा हेगडेने पूर्ण केले ‘राधे श्याम’चे डबिंग, मकर संक्रांतीला प्रभाससोबत शेअर करणार प्रेमकहाणी

दक्षिणात्य सिनेसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत आपले कौशल्य सिद्ध करणारी अभिनेत्री पुजा हेगडे (Pooja Hegde) सध्या चर्चेत आहे. लवकरच ही अभिनेत्री ‘राधे श्याम’मध्ये (Radhe Shyam) दिसणार आहे. ज्यात ती प्रेरणाच्या भूमिकेत, तर सुपरस्टार प्रभास विक्रमादित्यच्या भूमिकेत दिसणार आहे. ३५० कोटी रुपये खर्चून बनलेला ‘राधे श्याम’ हिंदीशिवाय तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. पुजाने तिचे तेलुगुमध्ये डबिंगचे काम पूर्ण केले असून, बाकीचे प्रलंबित काम ती सांभाळत आहे. ‘राधे श्याम’च्या टीमने ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

अलिकडेच, ‘राधे श्याम’च्या निर्मात्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये चित्रपटाची मुख्य अभिनेत्री हसताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमचे प्रदर्शनाच्या आणखी एक पाऊल जवळ! आमची प्रेरणा पुजा हेगडे हिने ‘राधे श्याम’चे डबिंग पूर्ण केले आहे.” हा चित्रपट मकर संक्रांतीच्या वेळी १४ जानेवारी २००२ रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आता पुजा तिच्या सहकलाकारासह रोमँटिक नाटकाच्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे.

नुकतेच ‘राधे श्याम’बद्दल बोलताना प्रसिद्ध गीतकार कृष्ण कांत यांनी चित्रपटातील पाचही गाणी लिहिली आहेत, अशी माहिती समोर आली आहे. यादरम्यान, त्यांनी चित्रपटाच्या कथेचे रहस्य देखील शेअर केले, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, ‘राधे श्याम’ १९७० च्या दशकातील युरोपच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे परंतु त्याबद्दल बरीच अटकळ आहे.

काहींचा असा विश्वास आहे की, हा चित्रपट पडद्यावर पुनर्जन्म किंवा काळाचा प्रवास दर्शवेल. तर काहीजण म्हणतात की, ‘राधे श्याम’ हे रेल्वे प्रवासादरम्यान घडणाऱ्या रहस्याबद्दल आहे. गीतकार पुढे म्हणाले होते की, “काहीही असो, हा सस्पेन्स तसाच ठेवूया.”

पुजाने २०१२ मध्ये दक्षिणात्य चित्रपटांमधून पदार्पण केले. तिचा पहिला चित्रपट ‘मुगामुडी’ होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला. २०१२ नंतर तिने दक्षिण इंडस्ट्रीमध्ये स्वत:चा ठसा उमटवला. अशा प्रकारे ती दक्षिण इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध अभिनेत्री बनली. पुजा हेगडेने २०१६ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आशुतोष गवारेकर यांच्या ‘मोहनजोदाड़ो’ चित्रपटात ती ऋतिक रोशनसोबत दिली होती. हा तिचा बॉलिवूड पदार्पण चित्रपट होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा