Saturday, November 23, 2024
Home कॅलेंडर ‘तुझी चड्डी नाही उतरवली, तर आदित्य नाव नाही सांगणार’, वादाशी घट्ट नातं असणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक

‘तुझी चड्डी नाही उतरवली, तर आदित्य नाव नाही सांगणार’, वादाशी घट्ट नातं असणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक

तब्बल 4 दशके बॉलिवूड सिनेमांतील गाण्यांना आपला आवाज देणारे दिग्गज गायक म्हणजे उदित नारायण होय. त्यांनी आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्यासोबतच त्यांचा मुलगा आदित्य नारायण हादेखील उत्तम गायक आहे. या बापलेकांनी अनेक सिनेमात एकत्र गाणीही गायली आहेत. मात्र, विशेष असे की, आदित्य याने बालकलाकार म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. मुख्य भूमिका साकारूनही त्याला बालकलाकाराच्या भूमिकेसाठीच ओळखले जाते. आदित्यने गायक, अभिनेता आणि अलीकडे सूत्रसंचालक अशा अनेक भूमिका साकारल्या. शनिवारी (दि. 6 ऑगस्ट) 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या खास वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या कारकीर्दीतील काही भन्नाट गोष्टींबद्दल…

आदित्य नारायण (Aditya Narayan) याचा जन्म 6 ऑगस्ट, 1987 रोजी मुंबईमध्ये झाला आहे. त्याचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच झाले. आदित्यचे वडील उदित नारायण (Udit Narayan) हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि नावाजलेले गायक, तर आई दीपा नारायण देखील गायिका असल्याने, लहानपणापासूनच संगीतमय वातावरणात तो लहानाचा मोठा झाला. त्यामुळे अगदी साहजिकच त्याच्यावर गाण्याचे संस्कार होत गेले. त्याने कल्याणजी वीरजी शहा यांच्याकडून संगीताचे धडे गिरवले.

आदित्यने वयाच्या चौथ्या वर्षापासूनच गाणे गायला सुरुवात केली. ‘लिटिल वंडर्स’ या प्लॅटफॉर्मवर त्याने गायला सुरुवात केली. 1992 साली ‘मोहिनी’ या नेपाळी सिनेमात गाणे गात, त्याने त्याच्या गायनाच्या करियरची सुरुवात केली. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्याने हे गाणे गायले. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान दिग्दर्शक सुभाष घई यांची नजर त्याच्यावर पडली आणि त्यांनी आदित्यला बालकलाकार म्हणून काम करण्याबद्दल विचारले. त्यानंतर जेव्हा आदित्यने होकार दिला, तेव्हा तो 1997 साली आलेल्या ‘परदेस’ सिनेमात बालकालाकराची भूमिका साकारताना दिसला. या सिनेमातील त्याने गायलेले ‘आय लव्ह माय इंडिया’ हे गाणे तुफान गाजले.

‘परदेस’ सिनेमाआधी त्याने ‘अकेले हम अकेले तुम’, ‘मासूम’, ‘शस्त्र’, ‘रंगीला’, ‘दिलजले’ आदी चित्रपटांमध्ये अनुक्रमे ‘अकेले हम अकेले तुम’, ‘छोटा बच्चा जान के हमको’, ‘लडकी दिवानी लडका दिवाना’, ‘रंगीला रे’, ‘मेरा मुल्क मेरा देश’ ही हिट गाणी गायली होती. मात्र, अभिनय आणि सोबत गाणे देखील गाण्याची संधी त्याला ‘परदेस’ सिनेमाने दिली. या चित्रपटानंतर त्याचे गाण्याचे, तर गाण्याचे अभिनयाचे करियर देखील सुसाट पळायला लागले. ‘जब प्यार किसीसे होता है’, ‘मासूम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आणि तुफान यश मिळवले. लहान असताना त्याने 100 पेक्षा अधिक गाणी गायली.

पुढे 2009 साली त्याने विक्रम भट्ट यांच्या ‘शापित’ चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून करियरची सुरुवात केली. मात्र, त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. हा सिनेमा फ्लॉप झाला आणि त्याचे अभिनेता होण्याचे स्वप्न देखील भंगले. त्यानंतर त्याने फक्त गाण्यावरच त्याचे लक्ष केंद्रित केले. आदित्यने गाण्यासोबतच टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर पदार्पण करत 13पेक्षा अधिक रियॅलिटी शोचे सूत्रसंचालन केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने तो ‘इंडियन आयडल 12’ संपल्यावर सूत्रसंचालन करण्यापासून ब्रेक घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

आदित्यने संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ सिनेमात ‘इश्क्याव ढिशक्यांव’ आणि ‘ततड ततड’ ही दोन गाणी गायली जी तुफान हिट झाली, तर मागच्यावर्षी आलेल्या ‘दिल बेचारा’ सिनेमात त्याने ‘मेरा नाम’ हे गाणे गायले.

आदित्य त्याच्या अनेक वादांमुळे देखील मोठ्या प्रमाणावर प्रकाश झोतात आला आहे. आश्चर्य वाटले ना… आदित्य आणि वाद? हो 2017 साली आदित्य नारायण रायपूरहून मुंबईला विमानाने प्रवास करत होता. मात्र, त्याच्याकडे अधिक सामान असल्याने कर्मचाऱ्याने आणखी 13 हजार रुपये भाडे भरण्यास सांगितले. या सामानाचे तो 10 हजार रुपयेच देणार असे सांगत, त्याने कर्मचाऱ्यासोबत वाद घातला होता. सोबतच ‘तू मला विमानात चढू देणार नाहीस, तर मी तुला मुंबईत पाहून घेईन. कारण मी कधी ना कधी मुंबईत पोहोचेनच ना… तेव्हा पाहू… तुझी चड्डी नाही उतरवली, तर माझं नाव आदित्य नारायण नाही,’ अशी धमकी देखील दिली होती.

आदित्य लगेच पुढच्याच वर्षी म्हणजे 2018 मध्ये पुन्हा वादात अडकला होता. 2018 मध्ये गाडी चालवताना त्याने एका रिक्षाला टक्कर दिली होती. या टक्करमुळे रिक्षात बसलेली प्रवासी महिला जखमी झाली आणि तिने आदित्यविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटकदेखील केली होती. त्यानंतर 10 हजार रुपये भरून त्याची सुटका झाली होती.

आदित्य आणि त्याचा मित्र 2011 साली एका पबमध्ये गेले होते. तिथे त्यांनी दारूच्या नशेमध्ये एका मुलीवर आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यामुळे त्या मुलीने आदित्यच्या कानफटात मारल्याची बातमी आली होती.

‘इंडियन आयडलच्या 11’व्या पर्वात आदित्य नारायण आणि नेहा कक्कड यांच्या प्रेम प्रकरणाची खूपच चर्चा रंगली होती. या कार्यक्रमाचा टीआरपी वाढावा यासाठी नेहासोबत लग्न करत असल्याचा ड्रामा त्याने केला होता. आदित्यने नेहासोबत सेटवरच सात फेरे घेत लग्न केल्याची अफवाही आली होती. परंतु नंतर हे सर्व नाटक टीआरपी वाढवण्यासाठी रचल्याचे समोर आले होते. त्यानंतर नेहाने रोहनप्रीत सिंगबरोबर लग्न केले, तर आदित्य नारायणने श्वेता अग्रवालसोबत लग्न केले.

‘इंडियन आयडल 12’ हे पर्व वादांमुळेच सर्वात जास्त गाजले. त्यात अमित कुमार आणि आदित्य नारायण यांचा वाद खूप गाजला. अमित कुमार यांनी या कार्यक्रमात येऊन ‘स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी मला पैसे देण्यात आले होते’, असा खुलासा केला होता. यावर आदित्यने ‘तुमची नाराजी तेव्हाच सांगायला हवी होती’, असे म्हटले होते. पुढे या कार्यक्रमात आलेल्या कुमार सानू, रूपकुमार राठोड, अनुराधा पौडवाल यांनी जेव्हा स्पर्धकांचे कौतुक केले, तेव्हा आदित्यने त्यांना विचारले होते की, ‘तुम्ही हे कौतुक स्वतःहून केले आहे की, आम्ही तुम्हाला करायला सांगितले आहे’, यावरून प्रेक्षकांनी आदित्यला खूप ट्रोल केले होते.

आदित्यने इंडियन आयडलच्या 12व्या पर्वात सवाई भट्टने गाणे सादर केल्यानंतर त्याला आदित्यने म्हटले होते की, ‘रागदारीचा नीट अभ्यास करून येत जा… आम्ही काय अलिबागवरून येथे आलो आहोत का?’ आदित्यने जाहीरपणे असे वक्तव्य केल्यामुळे वक्तव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आदित्यने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आदित्यने सोशल मीडियाद्वारे सर्वांची माफी मागितली होती.

अधिक वाचा –

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा