Wednesday, July 3, 2024

‘ज्या शोने मला ओळख मिळवून दिली तो शो…’, म्हणत आदित्य नारायणाने ‘सा रे गा मा पा’चे सूत्रसंचालन सोडले

मागील काही वर्षांमध्ये टीव्ही इंडस्ट्रीचे रुपडे मोठ्या प्रमाणावर पालटले आणि या या क्षेत्राला सुगीचे दिवस आले. या क्षेत्राचे महत्व लक्षात घेऊन अनेक मोठे कलाकार या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करताना दिसत आहे. अगदी महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ते सलमान खान, शाहरुख खान यांनी देखील या इंडस्ट्रीमध्ये काम केले किंबहुना अजूनही करत आहे. बॉलिवूड कलाकार वेगवेगळ्या रियॅलिटी शोच्या माध्यमातून टीव्हीवर काम करताना दिसतात. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सर्वात मोठा, लोकप्रिय आणि प्रसिद्ध शो म्हणून ‘सा रे ग मा प’ शो ओळखला जातो. या शोने आतापर्यंत मनोरंजनविश्वाला अनेक मोठे गायक आणि संगीतकार दिले आहेत. या शोची मोठी ओळख म्हणून अभिनेता, गायक आदित्य नारायणकडे पाहायला जायचे. मात्र आता आदित्यने या शोच्या संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.

नुकताच ‘सा रे ग मा प’ या हिंदी रियॅलिटी शोचा अंतिम भाग संपन्न झाला. आदित्य या शोचे सूत्रसंचालन करत होता. हा शो संपल्यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो आता ‘सा रे ग मा प’ या शोचे सूत्रसंचालन करणार नसल्याचे जाहीर केले आहे. मागील बरीच वर्षांपासून आदित्य या शोचा एक महत्वाचा भाग होता. या शोने आदित्यला एक उत्तम सूत्रसंचालक ही नवीन ओळख देखील मिळवून दिली. आदित्यने या ‘सा रे ग मा प’ शोचा अंतिम भाग झाल्यानंतर त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली.

आदित्यने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “”जड अंतःकरणाने मी ज्या ‘सा रे गा मा पा’ने मला ओळख मिळवून दिली त्या शोची होस्टिंग सोडत आहे. १५ वर्षे, ९ सीझन, ३५० भाग, वेळ खरोखरच पाखरासारखा उडून जातो. धन्यवाद नीरज शर्मा, माझा भाऊ. अजून खूप काही करायचे आहे.” यासोबतच त्याने त्याचे शोचं सेटवरील काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. आदित्यने त्याच्या या पोस्टमधून विशाल ददलानी, शान, नेहा कक्कड़, बप्पी लहिरी, सोनू निगम, साजिद वाजिद, अलका याज्ञीक, हिमेश रेशमिया, प्रीतम, मिका सिंगसोबतच शोसोबत जोडलेल्या अनेक कलाकारांचे आभार मानले.

आदित्यने ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि त्याचे फॅन्स कमेंट्स करताना दिसत आहे. संगीतकार, गायक विशाल दादलानीने लिहिले, “मी काय बोलू तुझा पहिला शो ‘सा रे ग म प’ माझा पहिला शो ‘सा रे ग म प’ मात्र मला अजूनही अशा आहे की, तू तुझा निर्णय बदलशील. जा आदि…जी ले अपनी जिंदगी! लव्ह यू,” आदित्यने सा रे ग म प या शोसोबतच टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अनेक रियॅलिटी शो होस्ट केले होते.

आदित्यने गेल्या वर्षीच सांगितले होते की, तो २०२२ मध्ये टीव्हीला अलविदा करेल आणि मोठ्या प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करेल. आदित्यने २००७ मध्ये ‘सा रे गा मा पा चॅलेंज’ या सिंगिंग रियॅलिटी शोमध्ये होस्ट म्हणून सुरुवात केली होती.

हेही वाचा 

हे देखील वाचा