Monday, July 1, 2024

ऐश्वर्या अन् अभिषेकचा ‘तेरे बिना’ गाण्यावर झक्कास डान्स, केमिस्ट्री पाहून चाहतेही म्हणाले, ‘नजर लागायला नको’

बच्चन घराण्याची लाडकी सून आणि माजी ‘मिस वर्ल्ड’ ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. तिच्या दमदार अभिनयावर आणि घायाळ करणार्‍या डोळ्यांवर चित्रपट क्षेत्रातील भलेभले स्टार फिदा झाले होते. म्हणूनच ऐश्वर्या रायच्या चित्रपटांची आणि तिच्या मनमोहक अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सध्या चित्रपटात जास्त दिसत नसली, तरी सोशल मीडियावर मात्र नेहमी सक्रिय असते. आपले अनेक फोटो व्हिडिओ ती आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते. अलीकडेच तिने पती अभिषेक बच्चनसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही डान्स करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

ऐश्वर्याच्या फॅन क्लबकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या तिच्या ‘गुरू’ चित्रपटातील ‘तेरे बिना’ या गाण्यावर तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachchan) डान्स करताना दिसत आहे. यावेळी ऐश्वर्याने घातलेला फिक्कट गुलाबी रंगाचा लेहंगा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर अभिषेक बच्चनसुद्धा लाल रंगाच्या सुटमध्ये रूबाबदार दिसत आहे.

या व्हिडिओने चाहत्यांना चांगलेच आकर्षित केले आहे. या सुंदर जोडीच्या डान्सचे प्रत्येकजण कौतुक करताना दिसत आहे. यावेळी एका चाहत्याने “नजर लागायला नको,” अशी सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. आणखी एका युजरने “काय सुंदर जोडी आहे,” अशी कमेंट केली आहे. सध्या प्रत्येकजण या व्हायरल व्हिडिओचे कौतुक करताना दिसत आहे.

अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही आपल्या आगामी चित्रपटात व्यस्त आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय लवकरच ‘पोन्नीयन सेल्वन’ या दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटात तिचा डबल रोल असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अभिषेक बच्चन ‘बच्चन सिंग’, ‘हॅप्पी अ‍ॅनिवर्सरी’, आणि ‘धूम ४’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा