छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही प्रसिद्ध मालिका संपून बरेच दिवस झाले आहेत. मात्र, त्यातील पात्र अजूनही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. प्रेक्षकांनी या मालिकेला खूप प्रेम दिले. सोबतच ‘राणा दा’ आणि ‘पाठक बाईं’ची लोकप्रियताही शिगेला पोहोचली. पाठक बाई अर्थातच अक्षया देवधर या मालिकेद्वारे घराघरात पोहोचली. तर दुसरीकडे ‘चालतंय की’ असं म्हणत राणा दानेही अवघ्या प्रेक्षकवर्गाच्या मनाचा ठाव घेतला. मालिकेतील अक्षया देवधर (Akshay Deodhar) आणि हार्दिक जोशीची (Hardik Joshi) प्रेमकथा बरीच गाजली. मात्र चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का देत, या ऑनस्क्रीन जोडीने ऑफस्क्रीनही एकमेकांचे होण्याचा निर्णय घेतला आहे.
होय! झालात ना चकित? अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीने साखरपुडा केला आहे. याबद्दल स्वत: अभिनेत्रीने माहिती दिली आहे. सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो शेअर करत, अक्षयाने चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने ‘जस्ट एंगेज्ड’ असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. केवळ चाहतेच नव्हे, तर कलाकारही यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
साखरपुड्यातील दोघांच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर अक्षयाने गुलाबी आणि हलक्या सोनेरी रंगाची साडी नेसली होती. कमीत कमी मेकअप आणि साध्या लूकमध्येही अभिनेत्री तितकीच सुंदर दिसत होती. हार्दिकनेही अक्षयाच्या लूकला अनुसरून पेहराव केला होता. तोही या लूकमध्ये बऱ्यापैकी देखणा दिसत होता.
अक्षयाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे रंगमंचावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदापर्ण केले होते. पण ‘तुझ्यात जीव रंगला’ मध्ये अंजली पाठकची भूमिका साकारत तिने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. दुसरीकडे हार्दिक जोशीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तो सध्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा