Friday, July 5, 2024

छोटे मोठे उपकार नाहीत, थेट जीव वाचवलाय साहेबांनी! वाचा बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ यांचा न ऐकलेला किस्सा

बॉलिवूड आणि राजकारण यांचं नातं तसं जवळचंच. देशातील अनेक कलाकारांनी अभिनयानंतर राजकारणाकडे मोर्चा वळवलेला दिसतो. तर अनेक राजकारण्यांचे कलाकारांसोबत मैत्री किंवा त्यापलीकडचे संबंध राहिल्याचे दिसून येते. बॉलिवूडचे महानायक ‘बिग बी’ म्हणजेच अमिताभ बच्चन यांचाही राजकारणाशी जवळचा संबंध राहिला आहे. एक म्हणजे ते स्वतः राजकारणात उतरले होते, तर दुसरं म्हणजे देशातील अनेक राजकारण्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

अमिताभ यांच्या या यादीत सर्वात अगोदर जर कुणाचे नाव येतं असेल, तर ते म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. याला कारणही तसेच खास आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण बाळासाहेबांनी एकदा अमिताभ यांचा जीव वाचवला होता. नेमका काय होता तो प्रसंग, जाणून घेऊयात या लेखातून…

मंडळी ठाकरे आणि बच्चन कुटुंबीयांचे संबंध नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले आहेत. अमिताभ यांचे जेव्हा जया बच्चन यांच्याबरोबर लग्न झाले होते, तेव्हा बाळासाहेबांनी या नव्या जोडप्याला आपुलकीने घरी बोलावले होते. अमिताभ हे देखील जया यांना घेऊन मातोश्रीवर पोहचले होते. त्यावेळी माँसाहेब म्हणजेच मीना ताईंनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले होते. अगदी सूनेप्रमाणे त्यांनी जया यांना घरात घेतले होते. अमिताभ यांच्या मनातही बाळासाहेबांविषयी वडिलांचा दर्जा होता. आणि हीच भुमिका पुढे बाळासाहेबांनी एका प्रसंगी पार पाडली होती.

ही गोष्ट आहे साल 1982 मधली. तेव्हा ‘कुली’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ यांचा अपघात झाला होता. आणि अगदी बेशुध्द अवस्थेतच त्यांना बंगळूरुहून मुंबईला विमानाने आणण्यात आलं होतं. मुंबईमध्ये आल्यावर अमिताभ यांना उपचारासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेऊन जायचे होते. परंतू, अडचण अशी होती की रुग्णवाहिका मिळत नव्हती. वेळ इतकी कठीण होती, जर रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नसती तर अमिताभ यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला असता. मात्र त्याचवेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अमिताभ यांच्या मदतीला धावून आले. आणि मरणाच्या उभे असणाऱ्या बिग बींना बाळासाहेबांनी शिवसेनेची रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली.

Photo Courtesy: ScreenGrab/ Youtube balasaheb thackeray and amitabh Vid
Photo Courtesy: ScreenGrab/ Youtube balasaheb thackeray and amitabh Vid

फक्त हाच प्रसंगच नाही, तर पुढेही आयुष्यात बाळासाहबांनी अनेकदा अमिताभ यांची मदत केली. अमिताभ यांच्यावर जेव्हा टीका होत असे, तेव्हा बाळासाहेब स्वतः त्यांच्याशी संवाद साधून खऱ्याखोट्याची शहानिशा करत. तसेच अनेकदा काही मुद्द्यांवर बोलण्यासाठी ते बिग बींना स्वतःच्या घरी देखील बोलावून घेत. अमिताभ यांच्या आयुष्यात बाळासाहेबांनी वडील, मित्र अशा अनेक भुमिका पार पाडल्या होत्या.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या टिझर लाँचवेळी अमिताभ बच्चन उपस्थित होते. त्यावेळी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना अमिताभ यांनी काही गोष्टींचा खुलासा केला होता. ते म्हटले होते की, “एकदा बाळासाहेब आजारी असताना त्यांना भेटायला मी त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांच्या खोलीमध्ये भींतीवर मला माझा फोटो दिसला.. हे पाहून मी चकितच झालो. बाळासाहेबांच्या घरात माझा फोटो लावलेला असेल, याची मला कल्पनाही नव्हती.” हे सांगत असताना तेव्हा बिग बींचे डोळे पाणावले होते.

बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्यातील हा जिव्हाळा आख्ख्या जगाने तेव्हा पाहिला, जेव्हा बाळासाहेबांचे निधन झाले होते. अगदी एकटे पडल्यासारखे महानायक अमिताभ बच्चन भरलेल्या डोळ्यांनी तेव्हा बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेत सामील झाले होते.

अधिक वाचा —-

हे देखील वाचा