×

अमजद खानच्या मुलाने केला खळबळजनक खुलासा; म्हणाला, ‘वडिलांच्या मृत्यूनंतर गॅंगस्टरने आईला…’

बॉलिवूडमधील खलनायकांची जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा एक नाव नेहमी डोळ्यासमोर येते. हे नाव अमजद खान (Amjad Khan) यांचे आहे. अगदी कमी वयातच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम झाला, याचा खुलासा आता त्यांच्या मुलाने केला आहे. त्यांचा मुलगा आणि अभिनेता शादाब खान (Shadab Khan) याने वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीबाबत धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. एका मुलाखतीदरम्यान शादाबने सांगितले की, त्याच्या वडिलांनी नेहमीच चित्रपट निर्मात्यांना पैसे दिले, परंतु ते कधीही परत मागितले नाहीत. वडिलांच्या निधनानंतर निर्मात्यांकडून १.२५ कोटी येणे बाकी होते, पण त्यांनी ते पैसे परत केले नाहीत, असे त्याने सांगितले.

अमजद यांचे जुलै १९९२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हा ते ५१ वर्षांचे होते. अमजद आणि शैला यांना शादाब, अहलम आणि सीमाब ही तीन मुले आहेत. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शोले’ हा त्यांचा सर्वात अविस्मरणीय चित्रपट आहे. यानंतर त्यांनी अनेक संस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले आणि वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. शादाबने मुलाखतीत सांगितले की, “माझ्या वडिलांना लोकांना मदत करण्याची आणि भरपूर पैसे देण्याची सवय होती. एकदा निर्माते घरी आले आणि त्यांना त्यांच्या घराच्या चाव्या देण्याचे वचन देऊन कथा सांगितल्या. पण त्यांना पैशाची पर्वा नव्हती. त्यांनी आपले पैसे बँकांकडे न ठेवता मित्रांकडे ठेवले. त्यांचे निधन झाले तेव्हा निर्मात्यांकडे त्यांचे १ कोटी २५ लाख देणे बाकी होते. मात्र त्यापैकी कोणीही पैसे देण्यासाठी पुढे आले नाही. त्याच्याकडून अनेकांनी कर्ज घेतले होते, पण मोजक्याच लोकांनी पैसे परत केले. कल्पना करा की, आम्ही किती पैसे गमावले जे आमचे होते.” (amjad khan son shadab made a sensational disclosure after death of his father)

पुढे तो म्हणाला, “माझ्या वडिलांच्या निधनानंतर चार महिन्यांनी मध्यपूर्वेतील एका गुंडाने फोन केला आणि म्हणाला की, त्याला माझ्या आईशी बोलायचे आहे. त्याने सांगितले की, त्याला अपुष्ट स्त्रोतांकडून कळले आहे की, तिच्या पतीचे इंडस्ट्रीवर १.२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. तो पुढे म्हणाला की, ती रक्कम तो तीन दिवसांत आणून देईल कारण तिचा पती चांगला माणूस होता. माझ्या आईने यावर स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाली की, तिच्या पतीने कधीही अंडरवर्ल्डचे उपकार घेतले नाहीत.” त्यावेळी आई खंबीर नसती तर आम्ही रस्त्यावर आलो असतो, असेही अभिनेता पुढे म्हणाला.

अमजद यांनी जवळपास २० वर्षांच्या कारकिर्दीत १३२ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, १९७५च्या क्लासिक ‘शोले’मध्ये त्यांना गब्बर सिंग म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘मुकद्दर का सिकंदर’मधील दिलावरच्या भूमिकेसाठीही त्यांची प्रशंसा झाली. याशिवाय त्यांनी ‘शतरंज के खिलाडी’, ‘जमानत’, ‘परवरिश’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘कुर्बानी’, ‘याराना’ आणि ‘चमेली की शादी’ या चित्रपटातही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post