Wednesday, June 26, 2024

‘१४ वर्षांच्या सहवासाचं फलित… ‘, म्हणत अमोल कोल्हे यांनी खास अंदाजात दिल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि धडाडीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे (amol kolhe) हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते नेहमीच अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांचे मत मांडत असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील ते अनेकवेळा त्यांचे मत व्यक्त करत असतात. अशातच अमोल कोल्हे यांच्या लग्नाला सोमवारी (६ डिसेंबर) १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत काही फोटो शेअर करून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक अभिनेता ते नेता या प्रवासात त्यांच्या पत्नीचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या सुखी संसाराला १४ वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी खास पोस्ट लिहिली आहे.

अमोल कोल्हे यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांची पत्नी अश्विनी यांच्यासोबतचा कोलाज फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या लग्नातील एक फोटो देखील दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “१४ वर्षांच्या वनवासाचं फलित काय असतं ते माहित नाही, पण १४ वर्षांच्या सहवासाचं फलित नक्कीच चांगलं आहे. माणूस म्हणून समृद्ध होणं, संसाराच्या परिघात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणं, परस्परपूरक भूमिका घेणं या प्रत्येक गोष्टीत आणखी सुधारणा होत असताना, दोन पाहुणे मात्र आजवर घराबाहेरच ठेवले आहेत ताटकळत.१) ‘तू चूक’ आणि २) ‘मीच बरोबर’. कारण तेवढं केलं की, सहवासाबरोबरच विरहाच्याही प्रत्येक क्षणाचा सोहळा होतो. समाधानाच्या उंबरठ्याच्या आत सुख नांदतं यावरचा विश्वास दृढ करणाऱ्या सहचारिणीस लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.” (Amol kolhe give best wishes to wife on 14 th wedding anniversary)

त्यांनी शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकजण त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याच्या या पोस्टला आतापर्यंत ३८ हजारापेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत. अमोल कोल्हे यांच्या पत्नी अश्विनी या देखील एक डॉक्टर आहेत. त्या दोघांना आद्या आणि रूद्र ही दोन मुले आहेत. त्यांच्या मुलीने आद्याने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत देखील काम केले आहे.

हे देखील वाचा