Saturday, July 27, 2024

भारदस्त आवाज, दमदार संवाद, नायकावरही भारी पडणारा असा हा खलनायक पुन्हा होणे नाही

या इंडस्ट्रीमध्ये अनेक लोकं फक्त मुख्य नायक आणि नायिका बनण्यासाठी येतात. मात्र, नायक आणि नायिका यांच्याव्यतिरिक्त देखील सिनेमांमध्ये अनेक महत्वाच्या भूमिका असतात. किंबहुना खलनायकाशिवाय नायकाला महत्व नसते. याच खलनायकाच्या भूमिका निभावून बॉलिवूडमध्ये खलनायकाला नायकाइतकेच महत्व प्राप्त करून देणारे अभिनेते म्हणजे अमरीश पुरी.

भारदस्त आवाज आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या जोरावर त्यांनी या ग्लॅमर क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. अमरीश पुरी हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर त्यांच्या अनेक खलनायकी भूमिका येतात. अमरीश पुरी यांनी त्यांच्या दमदार अभिनयासोबतच त्यांच्या उत्कृष्ट संवादफेकीमुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. अमरीश यांचे सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर रसिक फक्त अमरीश यांचे संवाद ऐकण्यासाठीच जायचे. अमरीश कदाचित पहिले असे खलनायक असतील ज्यांनी त्यांच्या बळावर चित्रपट यशस्वी केले आहेत.

22 जून 1931रोजी अमरीश पुरी यांचा जन्म झाला. अमरीश पुरी यांनी सुरुवातीच्या काळात सरकारी नोकरी केली. मात्र, अभिनयाची आवड असल्याने त्यांचे नोकरीत कधीच मन रमले नाही. तरीही त्यांनी 21 वर्ष विमा कंपनीत काम केले. इब्राहिम अल्काजी यांच्याशी त्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या या आवडीचे रूपांतर स्वप्नात झाले. इब्राहिम अल्काजी यांनी अमरीश यांना थियेटर करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अमरीश यांनी सत्यदेव दुबे यांची भेट घेतली आणि त्यांनी दुबे यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली.

1971साली आलेल्या ‘रेशमा और शेरा’ सिनेमातून त्यांनी मोठ्या पडद्यावर अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील अमरीश यांचा अभिनय सर्वानाच खूप आवडला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये अमरीश यांनी ज्या हेतूने प्रवेश केला, त्यांचा तो हेतू साध्य झाला पण वेगळ्या पद्धतीने. नायक होण्याच्या स्वप्नाने या क्षेत्रात आलेल्या अमरीश पुरी यांनी खलनायक होऊन नायकापेक्षा अधिक लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली.

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘नायक’, ‘मिस्टर इंडिया’, ‘करण अर्जून’, ‘चाची 420’, ‘दामिनी’, ‘गर्दिश’, ‘गदर’, ‘घातक’, ‘घायल’, ‘हीरो’, ‘कोयला’, ‘मेरी जंग’, ‘नगीना’, ‘फूल और कांटे’, ‘राम लखन’, ‘ताल’, ‘त्रिदेव’, ‘विधाता’ आदी जवळपास 450 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. अमरीश यांनी जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये क्रूर खलनायक रंगवला. मात्र त्यांनी साकारलेल्या सर्व खलनायकांवर भारी पडला तो 1987 साली आलेल्या ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील ‘मोगेम्बो’. त्यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या सिनेमातील त्यांचे संवादही अजरामर झाले.

अमरीश यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकांपेक्षा, ते त्यांच्या खऱ्या आयुष्यात एकदम विरुद्ध होते. अनेक दशकं या क्षेत्रात राहूनही त्यांचे कोणासोबत अफेअर झाले नाही. अमरीश यांच्या आयुष्यात सुरुवातीपासून ते त्यांच्या जाण्यापर्यंत फक्त एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे त्यांची पत्नी उर्मिला दिवेकर. या क्षेत्रात येण्याआधीपासूनच त्यांची आणि उर्मिला यांची भेट झाली होती. पंजाबी आणि साऊथ इंडियन अशी जोडी असणाऱ्या या कपलच्या लग्नासाठी घरातून खूप विरोध झाला. मात्र हार न मानता त्यांनी प्रयत्न केले आणि 1957 साली त्यांचे लग्न झाले.

अमरीश पुरी खूप मोठे आणि ताकदीचे अभिनेते होते. त्यांच्यातील अभिनेता किती खरा होता याचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी धर्मवीर भारती यांनी लिहिलेल्या ‘अंधायुग’ या नाटकात ‘धृतराष्ट्र’ ही भूमिका साकारली होती. अमरीश यांचे हे पहिलेच नाटक होते. मात्र हे नाटक करताना अंध दाखवण्यासाठी डोळे उघडे ठेवणे आवश्यक होते. पण असे राहण्यासाठी खूप त्रास होत होता. मुख्य म्हणजे 17 मिनिटांच्या या नाटकात अमरीश यांचे मोठे मोनोलॉग होते. पण जेव्हा नाटक सुरु झाले, तेव्हा त्यांनी एकही संवाद न विसरता 17मिनिट पापण्या न झपकता ही भूमिका निभावली. नाटक बघणारे प्रेक्षक देखील हैराण झाले की, 17 मिनिट ते पापण्या न झपकता कसे राहिले.

अमरीश यांच्या भूमिकांमध्ये ‘नागिन’ मधील ‘भैरोनाथ’, ‘सौदागर’ मधील ‘चुनिया’, ‘मिस्टर इंडिया’ मधील ‘मोग्याम्बो’, ‘दामिनी’ मधील ‘बॅरिस्टर इंद्रजीत चड्ढा’, ‘दिलवाले दुल्‍हनिया ले जाएंगे’ मधील ‘बलदेव सिंग’, ‘परदेस’ मधील ‘किशोरी लाल’, ‘कोयला’ मधील ‘राजा साहब’, ‘गदर’ मधील ‘अशरफ अली’ आणि ‘नायक’ मधील ‘बलराज चौहान’ या भूमिका खूप गाजल्या. या दमदार कलाकाराचे 12 जानेवारी 2005 रोजी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले.

अमरीश पुरी यांनी या क्षेत्रात येण्यासाठी आणि इथे टिकण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. त्यामुळे त्यांचा मुलगा राजीवने या क्षेत्रात यावे, अशी त्यांची बिलकुल इच्छा नव्हती. या अस्थिर इंडस्ट्रीमध्ये टिकण्यासाठी दिवसरात्र घ्यावे लागणारे कष्ट त्यांना मुलाला द्यायचे नव्हते. म्हणूनच त्यांनी मुलाला या इंडस्ट्रीमध्ये न येण्याचे सांगितले. आज त्यांच्या मुलगा मर्चंट नेव्ही मध्ये आहे.(amrish puri birthday unknown facts about amrish puri)

अधिक वाचा –
– खिशात 500 रुपये घेऊन मुंबईत आले, नाना पाटेकरांनी केलेली मोलाची मदत; मकरंद अनासपुरेंबद्दल तुम्हाला हे माहितीये का?
‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत

हे देखील वाचा