Saturday, July 27, 2024

खिशात 500 रुपये घेऊन मुंबईत आले, नाना पाटेकरांनी केलेली मोलाची मदत; मकरंद अनासपुरेंबद्दल तुम्हाला हे माहितीये का?

आपल्या आगळ्या वेगळ्या देहबोलीतून, विनोदी संवादांमधून आणि हटके भाषाशैलीमुळे मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे. (makarand anaspure) मकरंद यांनी मराठी सिनेसृष्टीला एक वेगळा विनोद आणि एक वेगळी भाषाशैली दिली. शिवाय मराठी इंडस्ट्रीवर मराठवाड्याच्या संस्कृतीचा ठसा उमटवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या याच हटके अंदाजामुळे त्यांनी रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. गुरुवारी (२२ जून) मकरंद अनासपुरे हे त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. मकरंद अनासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात काही खास गोष्टी…

मकरंद यांचा जन्म २२ जून, १९७३ साली औरंगाबादच्या बिडकीन गावात झाला. शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी इयत्ता चौथीत नाटकात काम केले. या नाटकासाठी त्यांना बक्षीस देखील मिळाले आणि इथूनच त्यांच्या मनात अभिनयाचा अंकुर फुटला. पुढे औरंगाबादमधील सरस्वती भुवन कॉलेजमध्ये अभिनयाचे प्राथमिक धडे गिरवत असताना त्यांनी कॉलेजमध्ये अनेक नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

तिथेच त्यांची ओळख किंबहुना मैत्री झाली मंगेश देसाईशी. पुढे मंगेश आणि मकरंद यांनी नाट्यदर्पण या नाटकांच्या स्पर्धेत सहभाग घेतला. अनेक फेऱ्यांमधून विजय मिळवत त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. या अंतिम फेरीसाठी ते मुंबईत आले. या अंतिम फेरीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाना पाटेकर उपस्थित होते. नानांनी मकरंद यांचा अभिनय पाहिला आणि त्यांना ‘मुंबईत ये इथे तुझे भविष्य उज्ज्वल आहे. तुला आवश्यक सर्व मदत मी करेल,’ असे सांगितले.

मकरंद यांनी कॉलेजमध्ये असताना अभिनयासोबतच दिग्दर्शन करायला सुरुवात केली. त्यांनी गावागावात जाऊन सुमारे ५०० पेक्षा अधिक पथनाट्य सादर केली. त्यांना प्रत्येक गावात जाऊन तिथली भाषा, संस्कृती जवळून पाहायला मिळाली. मात्र, कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांना हव्या तशा भूमिका मिळाल्या नाहीत. चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासाठी सुरुवातीला मिळेल त्या भूमिका त्यांनी केल्या.

केवळ ५०० रुपये घेऊन मकरंद मुंबईत आले. मुंबईत राहायला जागा नसल्याने सुरुवातीचा अनेक काळ त्यांनी आमदार निवासात राहून काढला. मुंबईत आल्यानंतर जवळपास ४ महिन्यांनी त्यांना केदार शिंदे यांच्या ‘झालं एकदाच’ या नाटकात फक्त ७ मिनिटांची भूमिका मिळाली. मात्र, या भूमिकेचे सर्वानी खूप कौतुक केले. मुंबईत वामन केंद्रे, चेतन दातार यांनी आणि नाना पाटेकरांनी मकरंद यांना खूप मदत केली. मकरंद यांना खरी ओळख मिळाली दूरदर्शनवरच्या ‘सून सून आभाळ’ या मालिकेने. या मालिकेत त्यांनी खलनायक रंगवला होता.

नाना पाटेकरांनी ‘यशवंत’ या सिनेमात त्यांनी मकरंदला केवळ अभिनेता नाही, तर सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिकाही मिळवून दिली. यासोबतच त्यांनी वजूद, जयसूर्या सिनेमातही त्यांनी काम केले. टीव्हीवर ‘बेधुंद मनाच्या लहरी’ ही त्यांची मालिका खूप गाजली.

मकरंद यांची ‘टूरटूर’, ‘जाऊबाई जोरात’, ‘टिकल ते पॉलिटिकल’ आदी नाटकं तुफान लोकप्रिय झाली. ‘जाऊबाई जोरात’ नाटकाच्या दरम्यान त्याची भेट झाली शिल्पा सोबत. पुढे जाऊन शिल्पा आणि मकरंद यांनी लग्न केले आणि आज त्यांना एक मुलगी देखील आहे.

पुढे मकरंदने १९९७ साली आलेला ‘सरकारनामा’ हा पाहिला मराठी सिनेमा केला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेने त्याने खूप प्रसिद्धी मिळवली. ‘सातच्या आत घरात’, ‘सावरखेड एक गाव’, ‘वास्तव’, ‘कायद्याच बोला’, ‘नाना मामा’, ‘गाढवाचं लग्न’, ‘खबरदार’, ‘शुभमंगल सावधान’, ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘साडे माडे तीन’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘दे धक्का’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘अगडबम’ आदी अनेक चित्रपटांमधून भूमिका साकारल्या. विनोदी भूमिकांसोबतच त्यांनी गंभीर भूमिकाही उत्तम पद्धतीने वठवल्या.

अभिनयसोबतच मकरंद यांनी लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीमध्ये देखील पाऊल ठेवले आहे. त्यांनी ‘डॅंबिस’ या सिनेमाचे लेखन करत ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ आणि ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या सिनेमांसाठी सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. मकरंद अनासपुरे हे जितके उत्तम अभिनेते आहेत तितकेच उत्तम ते माणूसही आहे.

मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते नाना पाटेकर याच्या बरोबर ‘नाम’ फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील कर्जबाजारी झालेल्यांना, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देतात.

अधिक वाचा –
– अजितदादांच्या हस्ते ‘आठवणी’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च, जाणून घ्या चित्रपटाबद्दल सर्वकाही
– ‘चौक’चा विजयी चौकार! प्रेक्षकांच्या पसंतीस का उतरतोय चौक? जाणून घ्या

हे देखील वाचा