Friday, July 5, 2024

प्रसाद ओकसाठी अमृता खानविलकरने लिहली खास पोस्ट, अभिनेत्याच्या प्रतिक्रियेने वेधले सर्वांचे लक्ष

सध्या मराठी सिने जगतात प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सिनेमागृहात या चित्रपटाने दमदार कमाई करत प्रेक्षकांना चांगलेच आकर्षित केले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कोटीची कमाई केली होती. चित्रपटातील अमृता खानविलकरच्या (Amruta Khanvilkar)  अभिनयाचे सर्वत्रच कौतुक होताना दिसत आहे. तिच्या घायाळ करणाऱ्या अदांंनी आणि तडफदार डान्सने सगळ्यांनाच मोहित केले आहे. सध्या चित्रपटातील अभिनेत्री अमृता खानविलकरच्या पोस्टची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. काय आहे तिची ही पोस्ट चला जाणून घेऊ. 

अभिनेत्री अमृता खानविलकरची प्रमुख भूमिका असलेला ‘चंद्रमुखी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. चित्रपटात अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारेने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकरने भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतलेली पाहायला मिळत आहे. अमृताने चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद ओकसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या व्हायरल पोस्टमध्ये  अमृताने सेटवरील एक व्हिडिओ पोस्ट केले आहे. हा व्हिडिओ लावणीच्या सवाल जबाबावेळीचा आहे ज्यामध्ये प्रसाद ओक अमृताला प्रत्येक स्टेप समजावून सांगताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अमृताने “चंद्रा सांगते ऐका, किती वर्णू त्याचा महिमा याच शब्दात सगळं आल. कादंबरी देण्यापासून ते शेवटचे गाणे करण्यापर्यंत तु माझ्यासाठी जे जे काही केलंस त्यासाठी मी सदैव तुझी ऋणी राहीन. तुझ्यामुळे मला नवीन ओळख मिळाली.” या शब्दात तिने प्रसाद ओकचे तोंड भरुन कौतुक केले आहे.

अमृताच्या या पोस्टवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र या पोस्टवरील खुद्द प्रसाद ओकच्या प्रतिक्रियेनेच सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना प्रसाद ओकने “गानं ऐकलंय तिचं, नाच पायलाय तिचा निस्ती चांगली न्हाय, त लैच भारी “कलावंतीन” हाय आमची “चंद्रा”. फकस्त नाचातच न्हाय तर अभिनयात बी लैच ताकदीची हाय आमची “चंद्रा”, आशीच ऱ्हा “चंद्रा” वानी. म्हंजी लोक जवा बी बघत्याल तवा मान ताठ करूनच बघत्याल तुज्याकडं,” अशा शब्दात अमृताचे तोंड भरुन कौतुक केले आहे. सध्या अमृताची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा