×

क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या अँड्र्यू सायमंड्सने भारतीय मनोरंजनविश्वात देखील केली कमाल

आपल्या स्फोटक फलंदाजीने गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा महान अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या (andrew symonds) अपघाती मृत्यूने (शनिवार, १४ मे) संपूर्ण क्रिडा जगतात शोककळा पसरली आहे. अनेक वर्ष जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने सर्वांनाच थक्क करणाऱ्या या महान खेळाडूने घेतलेली अशी एक्झिट प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेली असून जगभरातील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू याबद्दल आपला शोक व्यक्त करत आहेत. अँड्र्यू सायमंड्सने आपल्या खेळीने अनेकवेळा क्रिकेटच्या मैदानात भारतीय संघाला डिवचले असले तरी त्याचे भारत देशाशी विशेष नाते होते. फक्त मैदानातच नव्हेतर त्याने बॉलिवूडमधील चित्रपटात आणि सलमान खानच्या बिगबॉसमध्येही सहभाग नोंदवला होता. पाहूया त्याचे बॉलिवूडमधील हे गाजलेले किस्से. 

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज अँड्र्यू सायमंड्सने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत चित्रपटात अभिनय केला होता. त्याने 2011 मध्ये ‘पटियाला हाउस’ चित्रपटात काम केले. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात अँड्र्यू सायमंड्सने स्वतःचीच भूमिका साकारली होती. हा चित्रपट क्रिकेटवर आधारित होता, ज्यामध्ये अक्षय कुमारने मॉन्टी पानेसरपासून प्रेरित वेगवान गोलंदाजाची भूमिका साकारली होती. अँड्र्यू सायमंड्सचा हा पहिलाच चित्रपट असला तरी शूटिंगदरम्यान तो सेटवर पूर्णपणे रमला होता. अक्षय व्यतिरिक्त, तो सेटवर शूट दरम्यान सहकलाकार ऋषी कपूर, अनुष्का शर्मा आणि डिंपल कपाडियासोबत खूप एन्जॉय करताना अनेकदा दिसला होता.

त्याचबरोबर अँड्र्यू सायमंड्सने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर सलमान खानच्या रिअलिटी शो ‘बिग बॉस’च्या 5 व्या सीझनमध्येही भाग घेतला होता. त्यादरम्यान तो शोमध्ये पाहुणा म्हणून आला आणि दोन आठवडे राहिला. बिग बॉसच्या घरात इंग्रजी बोलण्यास मनाई असली तरी अँड्र्यू सायमंड्सला सूट देण्यात आली होती आणि पूजा मिश्राला त्याच्यासाठी बिग बॉसच्या घरात अनुवादक म्हणून आणण्यात आले होते. याच कार्यक्रमात अँड्र्यू सायमंड्सने पूजा मिश्राला प्रपोजही केला होता. या कार्यक्रमाने मला फॅमिलीचे महत्व काय असते हे शिकवले अशी प्रतिक्रिया त्याने बाहेर पडल्यानंतर दिली होती.

दरम्यान बिग बॉसनंतर अँड्र्यू सायमंड्स ‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’मध्ये दिसला. त्यादरम्यान त्याने बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूसोबत स्टेजवर दमदार परफॉर्मन्स दिला. या प्रतिभावान खेळाडूच्या जााण्याने जागतिक क्रिकेटचे मोठे नुकसान झाल्याचीही प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. अँड्र्यू सायमंड्सने वयाच्या ४७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post