एकता कपूरला टेलिव्हिजनची क्वीन म्हणून संबोधले जाते. तिला मिळालेले हे बिरुद अगदी खरे आणि तिला लागू होणारे आहे. तिने आजपर्यंत टीव्हीवर अनेक सुपरहिट मालिका दिल्या. नुसत्या सुपरहिट नाही तर सर्वाधिक काळ टीव्हीवर चालू असणाऱ्या मालिकांमध्ये तिच्याच मालिकांचा बोलबाला आहे. एकता कपूरची अशीच एक सुपरहिट आणि प्रसिद्ध मालिका म्हणजे ‘पवित्र रिश्ता’. या मालिकेने लोकप्रियतेचे आणि प्रसिद्धीचे शिखर गाठले होते. २००९ साली सुरु झालेली ही मालिका १४२४ भागांसोबत ५ वर्ष चालली. अर्चना आणि मानव या जोडीने तर तुफान क्रेझ निर्माण केली होती. त्यांच्या जोडीला आजही आदर्श जोडी मानली जाते. यामुळेच एकता कपूरने आणि झी 5 ने या शोला नवीन रूप आणि नवीन नाव देत या परंपरेला चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी ‘पवित्र रिश्ता … .इट्स नेवर टू लेट’ या नावाने शो करण्याचे ठरवले असून, त्या नवीन शोचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.
या शोमध्ये अंकिता लोखंडे अर्चनाची आणि शाहीर शेख मानवची भूमिका साकारताना दिसणार आहे. येत्या २८ जानेवारीपासून हा नवीन शो झी 5 वर स्ट्रीम होणार आहे. या शोबद्दल बोलताना अंकिता लोखंडे म्हणाली, “पवित्र रिश्ता साठी शूटिंग करणे म्हणजे घरी आल्यासारखी भावना असते कारण अर्चनाची भूमिका मला माझीच वाटते. या शोने मला त्या सर्व दिवसांची आठवण करून दिली, यावेळेस देखील हा शो माझ्यासाठी भाग्यशाली सिद्ध झाला कारण यावेळेस प्रेम, दुसरी संधी आणि ‘इट्स नेवर टू लेट’ने माझ्यातला विश्वास पुन्हा जागृत केला आहे. यासाठी मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, तुमचा आवडीचा शो पुन्हा एकदा नवीन सिझन घेऊन येत आहे. ८ भागांच्या या शोमध्ये अर्चना आणि मानव यांची केमिस्ट्री आणि नवीन ड्रामा पुन्हा येत आहे. मला अशा आहे की, या सिरीजच्या शूटिंग दरम्यान आम्हाला जे प्रेम जाणवले तेच तुम्हाला हा शो बघताना जाणवेल.”
तर शोमध्ये मानवची भूमिका करणारा शाहीर शेख म्हणाला, “मी याआधीच्या पर्वात मी एका माहित नसलेल्या भूमिकेत पाऊल ठेवले होते, मात्र लोकांनी मला दिलेले प्रेम पाहून मला देखील माझ्यात एक मानव असल्याची जाणीव झाली. मानवची निरागसता आणि सर्वांशी मिळता जुळता स्वभाव सर्व प्रेक्षकांच्या मनात जागा बनवून गेला. या पर्वाला देखील तसेच प्रेम मिळेल याची मला अपेक्षा आहे.” पवित्र रिश्ताचे हे नवीन पर्व येत्या २८ जानेवारीपासून झी 5 वर स्ट्रीम होणार आहे.
हेही वाचा :