एकेकाळी प्लॅटफॉर्मवर काढल्या होत्या रात्री, अनुपम खेर यांनी अशाप्रकारे मिळवले होते चित्रपटात काम

अनुपम खेर हे हिंदी चित्रपट जगतातील एक यशस्वी अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. गेली चार दशके ते आपल्या दमदार अभिनयाने या क्षेत्रात नाव कमावत आहेत, त्यांच्या अभिनयाचे असंख्य चाहते आपल्याला आज पाहायला मिळतात. फक्त हिंदीच नव्हेतर अनेक इंग्लिश चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या अभिनयाच्या जोरावरच अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत, मात्र त्यांचा इथपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास अजिबात सोपा नव्हता, अनेक अडचणी आणि संघर्ष करुन त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. आज ( ७ मार्च) त्यांचा वाढदिवस, जाणून घेऊ या त्यांच्याबद्दल.

बॉलिवूड म्हटले की, आपल्याला दिसते ते पैसा आणि प्रसिद्धी असलेली झगमगाटी दुनिया. मात्र या जगात आपले स्थान निर्माण करायला या कलाकारांना खूप कष्ट घ्यावे लागते, मेहनत करावी लागते. हिंदी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत जे आज या क्षेत्रात यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले आहेत.मात्र त्यांच्या या मार्गात अनेक अडथळे, संकटे आली मात्र तरीही या कलाकारांनी जिद्द सोडली नाही. यांपैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेते अनुपम खेर. (Aupam Kher) अनुपम खेर यांनी हिंदी चित्रपट जगतात आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे मात्र त्यांना आधी खूप संघर्ष करावा लागला होता.

अभिनेते अनुपम खेर यांचा जन्म ७ मार्च १९५५ ला शिमलामध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड असल्याने त्यांचे मन कधीच अभ्यासात रमले नाही, त्यामुळे त्यांनी अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. त्यासाठी मुंबईला ड्रामा स्कुलला ते आले मात्र त्यांना सुरूवातीच्या काही दिवसात प्रचंड त्रास सहन करावा लागला. कधी उपाशीपोटी तर कधी रेल्वे स्टेशनवर झोपून त्यांनी अनेक रात्री काढल्या. आपल्या पहिल्या चित्रपटासाठीही त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला.यासाठी त्यांचा आणि खुद्द महेश भट्ट यांचा मोठा वाद झाला होता.

महेश भट्ट यांच्या एका चित्रपटासाठी त्यांना ७० वर्षाच्या वृद्ध व्यक्तीची आवश्यकता होती. अनुपम खेर यांचे केस लवकर गेल्याने त्यांना ही भूमिका लगेच मिळाली. मात्र ऐनवेळी त्यांनी या चित्रपटातून अनुपम खेर यांना काढून टाकले. त्यामुळे अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांच्याशी वाद घातला. त्यांना याबद्दल थेट जाब विचारला मात्र त्यामागे महेश भट्ट यांची अशी कल्पना होती की ही भूमिका एखाद्या दिग्गज आणि अनुभवी कलाकाराने करावी. शेवटी महेश भट्ट यांनाही आपली चुक लक्षात आली आणि त्यांनी पून्हा एकदा यासाठी अनुपम खेर यांची निवड केली. या चित्रपटाने त्यांना प्रचंड यश मिळवून दिले. चित्रपटातील अनुपम खेर यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पााहिले नाही.

 

 

Latest Post