Wednesday, June 26, 2024

वाढदिवसाच्या दिवशी अनुपम खेर यांनी शेअर केला फोटो, फिटनेस पाहून थक्क झाला ह्रतिक रोशन

अनुपम खेर हे हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. एक प्रतिभावान आणि हरहुन्नरी कलाकार अशी त्यांची ओळख आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी चित्रपट जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ( ७ मार्च, २०२२) अनुपम खेर यांचा वाढदिवस. याच निमित्ताने त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो शेअर करत वाढदिवसाबद्दल माहिती दिली आहे.सध्या त्यांचा हा फोटो सगळीकडे वेगाने व्हायरल होत असून यावर त्यांच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी प्रचंड संघर्ष करत या क्षेत्रात प्रवेश मिळवला आहे. त्यांच्या याच संघर्षामुळे आज ते चित्रपट जगतात यशाच्या शिखरावर आहेत. यामध्ये अभिनेते अनुपम खेर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अनुपम खेर सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतात. आपले नवनवीन फोटो, व्हिडिओ ते चाहत्यांशी शेअर करत असतात. आज (७ मार्च) त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपला एक फोटो शेअर केला आहे.ज्यामध्ये त्यांचा दमदार फिटनेस पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या ही शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे.

आपल्या या फोटोसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, “मला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आज मी आपले ६७ वे वर्ष सुरू करत आहे. त्यामुळे मी माझ्यासाठी एक नवीन संकल्प करणार आहे,त्यासाठी मी खूपच उत्साही आहे. हा फोटो मी गेल्या काही वर्षापासून करत असलेल्या प्रयत्नाचे उदाहरण आहे ” असे म्हटले आहे. त्यांचे  चाहते  या फोटोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत सोबतच त्यांच्या फिटनेसचे कौतुकही करत आहेत. या फोटोवर अनेक कलाकारांनाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता ह्रतिक रोशनने यावर “वाढदिवसाच्या शुभेच्छा सर” असे म्हटले आहे. दरम्यान अनुपम खेर हे ‘द काश्मिरी फाइल्स’ या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे देखील वाचा