श्रीदेवी यांच्या सौंदर्याचे प्रतिबिंब असणारी त्यांची कन्या जान्हवी कपूरने गेल्याच महिन्यात तिचा २४वा वाढदिवस साजरा केला. ६ मार्च १९९७ साली मुंबईत जान्हवीचा जन्म झाला. तिला बालपणापासूनच चित्रपटाची पार्श्वभूमी लाभली. श्रीदेवी यांच्या सारखी दिग्गज अभिनेत्री आई, बोनी कपूर यांच्यासारखे बॉलिवूडमधील मोठे निर्माते वडील एवढ्या मोठ्या घरात तिचा जन्म झाला. ‘धडक’ या सिनेमातून २०१८ साली जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन याच वातावरणात जान्हवी मोठी झाली. त्यामुळे तिने हेच क्षेत्र करियरसाठी निवडले नसते तरच आश्चर्य. जान्हवी अभिनयतच करियर करणार हे तर नक्की होते. मात्र माध्यमांमध्ये चर्चा होती की, जान्हवी कोणत्या सिनेमातून एन्ट्री घेणार? त्याच दरम्यान मराठीमध्ये नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ‘सैराट’ची लोकप्रियता आणि कथा पाहून अनेक दिग्दर्शकांना हा सिनेमा विविध भाषेमध्ये बनवण्याचा मोह झाला. त्यातच करण जोहरने देखील हा सिनेमा हिंदीमध्ये करण्याचा ठरवले. याच सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीची वर्णी लागली.
जान्हवी आणि तिचा संपूर्ण परिवार तिचा या पदार्पणासाठी खूप आनंदित होते. पहिलाच सिनेमा आणि करण जोहर सारखा निर्माता, शशांक खेतान सारखा दिग्दर्शक असल्याने सर्व सुरळीत होते, मात्र अशातच सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काही महिने आधी श्रीदेवी यांचे अकाली निधन झाले. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला होता तर २० जुलै २०१८ रोजी सैराट चित्रपट रिलीझ झाला होता. आपल्या मुलीला मोठ्या पडद्यावर अभिनय करताना पाहण्याचे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिले. श्रीजी यांच्या अचानक असे निघून जाण्यामुळे त्यांच्या परिवारासोबतच फॅन्सला देखील खूप वाईट वाटले. श्रीदेवी यांचे दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये निधन झाले होते.
मात्र या क्षेत्राच्या नियमाप्रमाणे ‘द शो मस्ट गो ऑन’ म्हणत जान्हवीने या सिनेमाची शूटिंग पूर्ण केली आणि जुलै २०१८ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमाला जरी सरासरी प्रतिसाद मिळाला असला तरी जान्हवीच्या करियरची गाडी मात्र सुसाट वेगाने धावू लागली. तिने सिनेमा येण्याआधीच प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. सिनेमा आल्यानंतर तिचा फॅन फॉलोविंगमध्ये आणखीनच भर पडली.
धडक सिनेमानंतर जान्हवी २०२० मध्ये नेटफ्लिक्सच्या ‘घोस्ट स्टोरीज’या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली. यात तिने झोया अख्तरच्या शॉर्ट फिल्ममधे समीराची भूमिका साकारली होती. या दरम्यान ती अनेक जाहिराती आणि काही सिनेमातील गाण्यांमध्ये सुद्धा दिसली. यानंतर जान्हवीचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमा होता, ‘गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल’. बायोपिक असणाऱ्या या सिनेमाकडे फॅन्ससोबतच इंडस्ट्रीमधल्या सर्वांचेच लक्ष लागले होते.
मात्र २०२०मध्ये आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे ‘गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल’ हा सिनेमा चित्रपटगृहांऐवजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे ठरवले आणि हा सिनेमा ऑगस्ट २०२०मध्ये नेटफिल्क्सवर प्रदर्शित झाला. ह्या सिनेमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. पहिल्या सिनेमानंतर जान्हवीच्या अभिनयावर प्रश्न निर्माण करणाऱ्यांना तिने या चित्रपटाच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिले.
जान्हवीला तिचा करियरच्या सुरुवातीला अनेकांच्या टीकेला सुद्धा सामोरे जावे लागले. बॉलिवूडमध्ये होणाऱ्या नेपोटीझमच्या आरोपांमुळे अनेकांनी जान्हवीवर सडकून टीका केली. मात्र तिने कधीही लोकांच्या टीकेला उत्तर देणे महत्वाचे समजले नाही.
या क्षेत्रात येण्याआधीच जान्हवीच्या अफेयरच्या बातम्यांनी जोर धरला होता. तिचा सोशल मीडिया अकाऊंट वरील अनेक फोटोमुळे तिचा आणि तिचा मित्र असणाऱ्या अक्षत राजांच्या अफेरच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. जान्हवीच्या २१ व्या वाढदिवशी अक्षयने एक पोस्ट शेयर करत जान्हवीला शुभेच्छा देताना आय लव यू लिहिले होते. यामुळे त्यांच्या नात्याचा बऱ्याच बातम्या आल्या. मधेच तिचा आणि शिखरच्या नात्यांबद्दल देखील अनेक बातम्या आल्या. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.
या सर्व बातम्या काही दिवसांनी हवेत विरल्या मात्र आता काही दिवसांपूर्वी जान्हवी आणि कार्तिक आर्यन यांच्या अफेयरच्या देखील बातम्या आल्या होता. लवकरच जान्हवीचा राजकुमार राव आणि वरून शर्मा यांच्या सोबतच ‘रुही’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमात तिने एका भुताने झपाटलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा एक हॉरर कॉमेडी असणार आहे.
हेही वाचा-
–श्रीदेवीची लाडकी कन्या जान्हवी कपूरचे पहिले आयटम सॉंग रिलीझ, दोन दिवसांत दोन कोटी हिट्सचा टप्पा पार
–थ्रोबॅक व्हिडिओ: आठ वर्षांपुर्वी प्रभुदेवाबरोबर श्रीदेवीने या गाण्यावर धरला होता ठेका, पाहा धमाकेदार डान्स
–कामावर प्रेम असावे तर श्रीदेवीसारखे! १०३ डिग्री ताप असूनही केली होती गाण्याची शूटिंग, वाचा तिचे रंजक किस्से










