राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि अनेक मालिकांमधून आणि चित्रपटामधून आपल्या प्रभावी आणि जिवंत अभिनयाचे दर्शन घडवणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचे शुक्रवारी (१६ जुलै) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. सुरेखा सिकरी यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुरेखा सिकरी यांचा सर्वात गाजलेला त्यांच्या भूमिकेला वाहवाही मिळवून देणारा आणि त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या ‘बधाई हो’ सिनेमातील कलाकारांनी देखील सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल आठवणी सांगत आदरांजली व्यक्त केली.
आयुष्मान खुरानाने त्यांच्यासोबतचे दोन फोटो शेअर करत एक मोठी पोस्ट लिहिली आहे. यात त्याने लिहिले, “प्रत्येक चित्रपटात आमचा एक कुटुंब असते आणि आम्ही आमच्या स्वतःच्या कुटुंबापेक्षा चित्रपटाच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवत असतो. माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या चित्रपटांपैकी या (बधाई हो) चित्रपटात आमचे एक संपूर्ण कुटुंब होते. त्यात असणारे सर्व कलाकार परिपूर्ण होते. सुरेखा सिकरी या आमच्या त्या परिपूर्ण कुटुंबाच्या प्रमुख सदस्य होत्या. त्या त्यांच्या खऱ्या आयुष्यात मोकळ्या मनाच्या आणि मनसोक्त जीवन जगणाऱ्या व्यक्ती होत्या. मला आठवते आमच्या चित्रपटाचे स्क्रीनिंग संपल्यानंतर त्या जेव्हा रिक्षात बसल्या, ते पाहून मी आणि ताहिराने त्यांना त्यांच्या घरी सोडले. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, तुम्ही आमच्या सिनेमातील खऱ्या स्टार आहात. यावर त्या म्हणाल्या होत्या, मला आणखी काम मिळायाला पाहिजे. हे ऐकल्यावर आमच्या दोघांकडेही शब्द नव्हते. त्या त्यांच्या बिल्डिंगच्या दिशेने गेल्या. त्यांच्या बरोबरची ती माझी शेवटची भेट होती. एकदा फैज अहमद फैजच्या ओळी ‘मुझ-से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग’ या एकदा वाचा. तुमचे त्यांच्यावर नक्कीच प्रेम जडेल. एक दोषविरहित कलाकार, एक सिद्धहस्त कलाकार. तुमची कमी कायम भासत राहील. आम्हला दिलेल्या अविस्मरणीय आठवणींसाठी तुमचे आभार.”
याच सिनेमातील गजराज राव यांनी लिहिले, “चित्रपट बनवणे म्हणजे रेल्वेने प्रवास करण्यासारखे आहे. आपण येथे आपल्या सह प्रवाशांना भेटतो. काही लोकं त्यांचे टिफिन आणि हृदय तुमच्यासाठी खोलतात, तर काही लोकं तुमच्या सामानाची राखण करतात आणि काही संशयाने तुमच्याकडे बघतात. ‘बधाई हो’ नेहमीच आमच्यासाठी एक खास प्रवास राहणार आहे. जो आयुष्यभर मला नवनवीन स्टेशनवर घेऊन आला आणि मी खरोखरच आभारी आहे की, आमच्याकडे सूत्रसंचालक म्हणून सुरेखा जी होत्या. त्या खरंच सेटवर सर्वात छोट्या होत्या. एक अभिनेत्री म्हणून त्यांना अनुभवांशी कोणीच बरोबरी साधणार नाही. त्यांच्यामध्ये एका लहान मुलासारखा उत्साह होता. जसे आपल्या सर्वांच्या यात्रा अखेरीस समाप्त होतात आज आपण सुरेखाजी ना अलविदा म्हणत आहोत. धन्यवाद सुरेखा जी खूप अनमोल आठवणी दिल्यामुळे.”
नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे, “आज सकाळीच मला ही वाईट बातमी मिळाली की, सुरेखाजी यांचे निधन झाले आहे. जेव्हा मी नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये शिकत होती, तेव्हा मी त्यांना पाहून विचार करायचे की, मला यांच्यासारखे व्हायचे आहे. ही खूप आधीची गोष्ट आहे. मग मला त्यांच्यासोबत ‘बधाई हो’ करण्याची संधी मिळाली. त्याआधी सलोनीमध्ये आम्हीसोबत काम केले होते. मी पाहायची त्या त्यांच्या सीनवर कशा काम करायच्या. मी त्यांच्याकडून खूप काही शिकले आणि खूप काही शिकणे बाकी होते.”
सुरेखा यांच्या निधनाने अवघ्या हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लग्नापूर्वी दिशाच्या रूमबाहेर ‘मेरी दुल्हन कहा है’, म्हणत ओरडताना दिसला राहुल; नववधू बाहेर येताच…
-महाकठीण! ‘या’ फोटोतील कपिल शर्माला ओळखलं का? कॉमेडियनने दिलं मजेशीर चॅलेंज