Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बप्पी लहिरी यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींसह बॉलिवूडमधील कलाकारांनी दुःख व्यक्त करत वाहिली श्रद्धांजली

नवीन वर्षातील फेब्रुवारी महिना बॉलिवूडची किंबहुना संपूर्ण देशातील संगीत सृष्टीसाठी वाईट ठरत आहे. काही दिवसांपूर्वी गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले. लता दीदींनंतर काही दिवसातच जेष्ठ बंगाली गायिका संध्या मुखर्जी यांचे निधन झाले, आणि आता लोकप्रिय संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांनीही जगाचा निरोप घेतला. भारतात डिस्को संगीताला ओळख मिळवून देणारे, हे संगीत लोकप्रिय करणारे बप्पी लहिरी यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा असा आवाज आणि दमदार संगीत देण्याची त्यांची कला संगीत प्रेमींना नेहमीच भुरळ घालत होती. संगीतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत पठडीबाहेर संगीत त्यांनी चित्रपटांना दिले. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर मोठी दुःखाची छाया पसरली आहे. बॉलिवूडमधील या ‘गोल्ड मॅनला’ अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लिहिले, “बप्पी लहिरी यांचे संगीत सर्वांगीण होते. गाण्यातून, संगीतातून त्यांनी विविध भावना अतिशय उत्तम पद्धतीने व्यक्त केल्या. त्यांचा जिवंत स्वभाव सर्वानाच आठवेल. त्यांच्या निधनामुळे दुखी आहे.”

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी लिहिले, “आणखी एक तारा निखळला. मला संजय गुप्ता यांच्या व्हाईट फेदर फिल्म्समध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. अत्यंत माधुर्य आणि प्रतिभासंपन्न असलेला माणूस.”

संगीतकार अशोक पंडित यांनी लिहिले, “बप्पी लहरी यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला. मला विश्वास बसत नाहीये की माझा शेजारी गेला. त्यांचे संगीत कायम आमच्या हृदयात राहील.”

दिग्दर्शक सुभाष घई यांनी लिहिले, “आय एम ए डिस्को डान्सर, मुंबई से आया मेरा दोस्त आणि असे अनेक आजच्या पिढीला आवडतील असे गाणे त्यांनी केले. त्यांनी त्यांच्या देसी डिस्को आणि भारतीय गाण्याने हिंदी चित्रपट संगीतात फरक निर्माण केला. एक उमदा प्रतिभावान गुरु आता नसले तरी त्यांचे संगीत आपल्यासोबत कायम राहील.”

अजय देवगणने लिहिले, “बप्पी दा व्यक्तिशः खूप लाडका होता. त्यांच्या संगीताला एक धार होती. चलते चलते, सुरक्षा आणि डिस्को डान्सर आदी चित्रपटातील संगीतामध्ये त्यांनी अधिक समकालीन संगीताशी लोकांची ओळख करून दिली. तुम्ही कायम लक्षात राहाल दादा .”

रवीना टंडनने लिहिले, “तुमचे संगीत आणि गाणी ऐकतच आम्ही मोठे झालो, बप्पी दा, तुमची स्वतःची एक स्टाईल होती आणि नेहमी तुमचा हसरा चेहरा. तुमचे संगीत कायम स्मरणात राहील.. ओमशांती.”

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू असलेल्या विराट कोहलीने लिहिले, “लहिरी हे भारतीय संगीत क्षेत्राचे एक आयकॉन होते. तुमची खूप आठवण येईल बप्पी दा. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.”

माजी क्रिकेटर असणाऱ्या सचिन तेंडुलकरने देखील त्याच्या भावना व्यक्त करत म्हटले, “मी बप्पी दा यांच्या संगीताचा नेहमीच आनंद घेतला. ‘याद आ रहा है’ हे गाणे मला विशेष आठवते. मी हे गाणे ड्रेसिंग रूममध्ये अनेकदा ऐकले आहे. त्यांची प्रतिभा असमान्य होती. बप्पी दा तुमची नेहमी आठवण येईल.”

यासोबतच राजकारण, खेळ, सामाजिक आदी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी बप्पी लहिरी यांना आदरांजली वाहिली आहे.

हेही वाचा :

हे ही पाहा :

हे देखील वाचा