Thursday, April 25, 2024

दु:खद! ज्येष्ठ बंगाली अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; संगीत नाटक अकादमी पुरस्काराने केले होते सन्मानित

चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ बंगाली अभिनेत्री स्वातिलेखा सेनगुप्ता यांचे बुधवारी (१६ जून) कोलकाता येथे निधन झाले आहे. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्या दीर्घकाळापासून किडनीशी संबंधित आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे बंगालीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही शोककळा पसरली आहे आहे. सोशल मीडियामार्फत अनेक कलाकार स्वातिलेखा यांना श्रद्धांजली वाहत आहेत. (Bengali Veteran Actress Swatilekha Sengupta Passes Away)

स्वातिलेखा यांच्याप्रमाणेच त्यांचे पती रूद्रप्रसाद आणि मुलगी सोहिनीदेखील थिएटरचा भाग होत्या. स्वातिलेखा यांची मुलगी सोहिनी आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखली जाते.

स्वातिलेखा यांच्या निधनावर मुलगी सोहिनीने म्हटले की, “आईच्या कामाला नेहमी आठवणीत ठेवले जाईल. ती लोकांच्या मदतीसाठी ओळखली जाते आणि ती एक गोल्ड मेडलिस्टही होती.”

स्वातिलेखा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात थिएटरपासून केली होती. त्यांनी सत्यजीत रे यांच्या ‘घरे बाइरे’, नंदिता रॉय यांच्या ‘बेला शेष’ आणि राज चक्रवर्ती यांच्या ‘धर्मजुद्धा’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांना सन २०११ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. याव्यतिरिक्त त्यांना थिएटरमधील आपल्या योगदानासाठी पश्चिम बंगाल नाट्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित केले होते.

हे देखील वाचा