Thursday, March 28, 2024

सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन; रामायणात साकारली होती ‘आर्य सुमंत’ची भुमिका

आजची सकाळ बॉलिवूडसाठी अतिशय दुःखद ठरली. हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ कलाकार चंद्रशेखर वैद्य यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी आज वृद्धापकाळाने निधन झाले. चंद्रशेखर वैद्य यांनी अतिशय लोकप्रिय झालेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत ‘आर्य सुमंत’ ही भूमिका साकारली होती. यासोबतच चंद्रशेखर यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकारांच्या भूमिका केल्या.

चंद्रशेखर यांचा जन्म ७ जुलै १९२३ रोजी हैद्राबादमध्ये झाला होता. त्यांचे वडील डॉक्टर होते. चंद्रशेखर खूप लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले आणि त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. पुढे चंद्रशेखर हे त्यांच्या आजीसोबत बंगलुरूला आले. वयाच्या १३ व्या वर्षीच चंद्रशेखर यांचे लग्न झाले होते. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांनी त्यांचे शिक्षण देखील अर्ध्यावरच सोडले आणि घराला हातभार लावण्यासाठी त्यांनी शिपाई म्हणून देखील काम केले. चंद्रशेखर यांनी भारत छोडो आंदोलनात देखील सहभाग घेतला होता. (veteran actor chandrashekhar vaidya passes away)

मित्रांच्या सांगण्यावरून चंद्रशेखर चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त ४० रुपये होते. खूप प्रयत्न करून त्यांना एका पार्टीच्या सीनमध्ये एक छोटा रोल मिळाला. अनेक वर्ष त्यांनी जुनियर आर्टिस्ट म्हणून काम केले. पण त्यावर त्यांचे जीवन भागात नसल्याने त्यांनी मुंबई सोडली आणि ते पुण्यात गेले. तिथे त्यांनी गायक म्हणून काम करण्यास सुरवात केली. पुण्यातच भरतभूषण यांच्यासोबत त्यांनी तीन चित्रपट बनवले. १९५० साली आलेल्या ‘बेबस’ सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

रामानंद सागर आणि चंद्रशेखर वैद्य हे खूप चांगले मित्र होते. रामानंद सागर यांच्या सांगण्यावरूनच चंद्रशेखर यांनी ‘रामायण’मध्ये राजा दशरथचे मंत्री असलेल्या ‘आर्य सुमंत’ यांची भूमिका निभावली. ही भूमिका खूप गाजली आणि चंद्रशेखर यांना नवीन ओळख देखील मिळाली.

चंद्रशेखर यांनी CINTAA असोसिएशनचे गठन केले. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये ‘कटी पतंग’, ‘हम तुम और वो’, ‘अजनबी’, ‘महबूबा’, ‘अलग-अलग’, ‘शक्ति’, ‘शराबी’, ‘डिस्को डांसर’, ‘नमक हलाल’, ‘द बर्निंग ट्रेन संसार’, ‘हुकूमत’, ‘गेट वे ऑफ इंडिया’, ‘फॅशन’, ‘बरसात की रात’, ‘बात एक रात की’, ‘अंगुलीमाल’, ‘रुस्तम-ए-बगदाद’, ‘किंग कॉन्ग’ आदी ११० पेक्षा अधिक सिनेमे केले. १९६४ साली आलेल्या ‘चा चा चा’ आणि १९६६ मध्ये आलेल्या ‘स्ट्रीट सिंगर’ या दोन सिनेमांचे त्यांनी दिग्दर्शन देखील केले होते.

तसेच, चंद्रशेखर यांना दोन मुलं आणि एक मुलगी असून प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शक्ती अरोड़ा हा चंद्रशेखन यांचा नातू आहे.

दैनिक बोंबाबोंबचे

टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

भन्नाटच! कियारा आडवाणी बनलीय ‘स्टंट गर्ल’, एकाच किकमध्ये उडवली समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावरील टोपी

-कॅन्सर पीडित व्यक्तीने भावुक होऊन धरले थेट सोनू सूदचे पाय, अभिनेत्याने दिली ‘अशी’ रिऍक्शन

-‘इंडियन आयडल’मधील स्पर्धकाचे गाणे ऐकून अनु मलिक यांनी स्वत:लाच मारली होती थोबाडीत; जुना व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा