Friday, April 19, 2024

भोजपुरी गाणे ‘हे मां शारदे’ मधून सरस्वतीमातेची केली जातेय वंदना, अंजली सिंगचे ‘हे’ गाणे आहे ट्रेंडिंग

भोजपुरी गाणे म्हटले की लगेच डोळ्यासमोर येतात भडक कपडे, विचित्र शब्द, भरपूर बॅकग्राऊंड डान्सर्स, बोल्ड, हटके संगीत असलेली गाणी. भोजपुरी गाण्यांसोबत एक गोष्ट सुद्धा येते ती म्हणजे मादकता. हो, बऱ्याच गाण्यांमध्ये नायक आणि नायिकेमध्ये प्रमाणापेक्षा अधिक लगट दाखवली जाते, आणि हीच या गाण्यांची खरी ओळख आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

मात्र याच भोजपुरी गाण्यांमध्ये काही असे सुद्धा काही गाणी आहेत, ज्यांनी त्यांच्या साधेपणामुळे ओळख मिळवली आहे. भक्तिगीते फक्त मराठीत नाही तर भोजपुरीमध्ये सुद्धा आहेत. असेच एक भक्तीगीत सध्या खूप गाजत आहे. गाण्याचे बोल आहे, ‘हे मां शारदे’. अंजली सिंग आणि आरोही यांच्या आवाजातील हे गाणे वसंतपंचमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्याला आलम दिलशाद यांनी शब्दबद्ध केले असून, टिंकू तुफान यांनी संगीत दिले आहे.

या गाण्याचे निर्माता नीरज सिंग असून, त्यांनी सांगितले की, ” ‘हे मां शारदे’ हे गाणे एक सरस्वतीवंदना आहे. या गाण्यातून आम्ही एका नवीन पद्धतीने सरस्वती मातेची स्तुती केली आहे. भोजपुरीमध्ये नेहमी वेगवेगळ्या सणांसाठी, वेगवेगळ्या खास दिवसांसाठी अनेक गाणे तयार होतात. यावर्षी आम्ही अंजली आणि आरोहीसोबत हे नवीन गाणे सर्वांसमोर आणले आहे.”

निर्माता नीरज पुढे म्हणतात, ” या गाण्याशी संबंधित असणाऱ्या सर्वानीच हे गाणे सर्वोत्कृष्ट व्हावे यासाठी १०० टक्के प्रयत्न केले आहेत. देवी सरस्वतीला साद घालणाऱ्या या गाण्याला आतापर्यंत प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला असून, आम्हाला अनेक जणांनी हे गाणे आवडल्याचे सांगितले आहे.”

हे देखील वाचा