Friday, March 29, 2024

‘कच्चा बादाम’ फेम भुबन बादायकरला कळली आपली चूक, ‘सेलिब्रिटी’ कमेंटबद्दल मागितली माफी

सोशल मीडिया आज असे प्लॅटफॉर्म बनले आहे की, सर्वसाधारण व्यक्ती देखील या माध्यमातून आपली ओळख निर्माण करू शकते. या माध्यमातून अनेक लोक एका रात्रीत सेलिब्रिटी बनतात हे समजतच नाही. पण तसे पाहिलं तर प्रसिद्धीही सोबत एक वेगळाच अहंकार घेऊन येते. असाच काहीसा प्रकार ‘कच्चा बादाम’ गायक भुबन बादायकरसोबत घडला. या गाण्याने त्याला एका रात्रीत लोकप्रिय केले आणि भुवन स्टार झाला. देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात लोक त्याला ओळखू लागले. सेलेब्सनी त्याच्यासाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्यासोबत डान्स केला. मग काय भुवन बादायकर स्वतःला ‘सेलिब्रेटी’ समजू लागला. याच कार्यक्रमात भुबनने सांगितले की, आता त्याला शेंगदाणे विकण्याची गरज नाही, कारण तो लोकप्रिय झाला आहे. सेलिब्रिटी बनला आहे. त्याचे हे बोलणे सोशल मीडिया युजर्सना आवडले नाही. त्याचे हे बोलणे चर्चेचा विषय ठरले आहे.

भुबनने मागितली माफी
माध्यमांतील वृत्तानुसार, भुबन बादायकरने त्याच्या ‘सेलिब्रेटी’ विधानाबद्दल माफी मागितली आहे. गरज पडली, तर पुन्हा शेंगदाणे विकण्यासाठी घराबाहेर पडणार असल्याचे तो म्हणाला. भुबन म्हणाला की, “मला आता जाणवले की मी असे बोलायला नको होते. लोकांनी मला सेलिब्रिटी बनवले आणि आता पुन्हा अशा परिस्थितीत उभा राहिलो, तर मी पुन्हा शेंगदाणे विकायला सुरुवात करेन.”

भुबन पुढे म्हणाला की, “मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला लोकांचे इतके प्रेम मिळाले. मी एक साधा माणूस आहे आणि या साधेपणाने मी माझे जीवन जगतो. स्टारडम, मीडिया अटेन्शन आणि ग्लॅमर या गोष्टी आमच्यासारख्या लोकांसाठी बनवल्या जात नाहीत. त्या माणसाबरोबर कायमचा राहत नाही. मला तुम्हा सर्वांना खात्री द्यायची आहे की, मी माणूस म्हणून बदललो नाही. तुम्ही सर्वांनी मला व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे मी अजूनही तसाच सामान्य माणूस आहे.”

भुबन बादायकर पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कुरलजुरी गावचा आहे. त्याचे पाच जणांचे कुटुंब असून, त्यात भुबन त्याची पत्नी, दोन मुले आणि एका मुलीसह राहतो. तो शेंगदाणे विकतो. ‘कच्चा बादाम’ हे गाणं इतकं व्हायरल झालं की, भुबनला एका रात्रीत स्टार बनवले. शेंगदाणे विकण्यासाठी तो आधी सायकलने, नंतर मोटारसायकलने जाऊ लागला. तो दिवसातून दोन ते तीन किलो शेंगदाणे विकायचा. मात्र त्याचे गाणे लोकप्रिय झाल्यापासून त्याची शेंगदाण्याची विक्री चांगलीच वाढली आहे.

दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

 

हे देखील वाचा