Saturday, July 27, 2024

धक्कादायक! बिग बॉस फेम ‘या’ मराठमोळ्या कलाकाराला देखील आला होता कास्टिंग काऊचचा विदारक अनुभव

मनोरंजनविश्वातील ग्लॅमर, पैसा, फेम आदी गोष्टी सामान्य लोकांना या क्षेत्राकडे खूपच आकर्षित करत असतात. या क्षेत्रात हे सर्व तर नक्कीच आहे सोबतच अशा अनेक घाणेरड्या गोष्टी आहेत, ज्याची सामान्य लोकं कल्पना देखील करू शकत नाही. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे कास्टिंग काऊचं. याबद्दल आजपर्यंत आपण खूप ऐकले असेल. अनेक मोठमोठ्या आणि दिग्गज कलाकारांना देखील याचा अनुभव आला आहे. या कास्टिंग काऊच करणाऱ्यांमध्ये या इंडस्ट्रीमधील अनेक नावाजलेल्या लोकांचा समावेश आहे. आता नुकताच याचा एक अनुभव बिग बॉस १६ मधील सर्वात जास्त गाजलेला मराठमोळा स्पर्धक असणाऱ्या शिव ठाकरेने सांगितला आहे.

शिव ठाकरेने अनेक रियॅलिटी शोमध्ये काम करत मोठा नावलौकिक मिळवला आहे. बिग बॉसने तर त्याला अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. याचमुळे तो आता त्याचे सर्वच स्वप्न पूर्ण करत आहे. नुकतेच त्याने त्याचे हॉटेल सुरु केले, नवीन गाडी घेतली. अशातच एका मुलाखतीदरम्यान त्याने त्याच्या संघर्षाच्या दिवसांना आठवत अनेक गोष्टी सांगितल्या. त्यातलीच एक म्हणजे त्याला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)


मूळचा अमरावतीचा असणारा शिव आता एक लोकप्रिय आणि ओळखीचा चेहरा बनला आहे. मात्र त्याने देखील त्याच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये कास्टिं काऊचचा विदारक अनुभव घेतला आहे. त्याने मुलाखतीमध्ये याबद्दल सांगितले, “मी एकदा आराम नगरमध्ये ऑडिशन देण्यासाठी गेलो होतो. तिथे एक माणूस मला बाथरूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, ‘हे मसाज सेंटर आहे’. मला ऑडिशन आणि मसाज सेंटर यांचा संबंध समजलाच नाही. तो मला म्हणाला, ‘ऑडिशननंतर एकदा तू इथे ये. तू वर्कआउटपण सुद्धा करतोस का?’ पुढे मी तिथून बाहेर पडलो. कारण तो एक कास्टिंग डायरेक्टर होता. मला त्याच्याशी कोणताच वाद घालायचा नव्हता. मी सलमान खान नाही. मात्र यानंतर एक गोष्ट समजली की, कास्टिंग काउचच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष असा कोणताही भेदभाव केला जात नाही.”

शिव ठाकरेने पुढे अजून एक कास्टिंग काऊचचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “चार बंगल्यात एक मॅडम होत्या. त्या मला म्हणायच्या, ‘मी याला स्टार केले, मी त्याला स्टार केले.’ त्या मला रात्री ११ वाजता ऑडिशनसाठी बोलावत होत्या. मी एवढाही वेडा नव्हतो की, लक्षात येणार नाही रात्री ऑडिशन्स नसतात. मी त्यांना म्हणालो मला काम आहे मी येऊ शकत नाही. त्या म्हणाल्या, ‘तुला काम नाही करायचं का?’ ‘तुला इंडस्ट्रीत काम मिळणार नाही’ मात्र मला त्याची कधीच पर्वा नव्हती.”

दरम्यान मीडियामधील माहितीनुसार लवकरच शिव ठाकरे रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडीमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक

ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…

हे देखील वाचा