Tuesday, July 9, 2024

सुरुवातीला केले रिपोर्टर म्हणून काम; तर ‘या’ चित्रपटाच्या यशानंतर जॅकलिनला सलमानकडून मिळाला होता ३ बीएचके फ्लॅट गिफ्ट

बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जॅकलिन फर्नांडिस होय. जॅकलिन बुधवारी (११ ऑगस्ट) आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म ११ ऑगस्ट, १९८५ रोजी झाला. जॅकलिन मूळची श्रीलंकेची आहे. जॅकलिनने खूप कमी काळात बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे. ती २००६ मध्ये मिस श्रीलंका युनिव्हर्स बनली होती. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिचा जीवनप्रवास…

चित्रपटात येण्यापूर्वी केले टीव्ही रिपोर्टर म्हणून काम
जॅकलिनने ऑस्ट्रेलियातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी मिळवली. श्रीलंकेची मिस युनिव्हर्स असलेल्या जॅकलिनने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी टीव्ही रिपोर्टर म्हणून काम केलं होतं. वयाच्या १४ व्या वर्षी जॅकलिनने बहरीनमध्ये एका टेलिव्हिजन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. जॅकलिनने २००९ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जॅकलिनचे वडील श्रीलंकेत संगीतकार होते. पण नागरी गृहयुद्धामुळे १९८० च्या दशकात ते बहरीनला निघून गेले. जॅकलिनची आई किम हवाई सुंदरी होती. चार भावंडांमध्ये जॅकलिन सर्वात लहान आहे. तिला एक मोठी बहिण आणि दोन मोठे भाऊ आहेत.

जॅकलिनला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. जॅकलिन लहानपणापासूनच गोंडस दिसायची. तिचे लक्ष अभ्यासात कमी आणि अभिनयाकडे जास्त दिसत होते. जेव्हा तिने पहिला कार्यक्रम आयोजित केला, तेव्हा ती फक्त १४ वर्षांची होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना जॅकलिन म्हणते,”लहानपणापासूनच मला चित्रपटांमध्ये काम करायची इच्छा होती. मला वाटायचं की, मी कधीतरी सिनेस्टार होईल.”

अभिनयाची आवड असणाऱ्या जॅकलिनने जॉन स्कूल ऑफ ऍक्टिंगमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केले. मॉडेलिंगच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर ती २००९ मध्ये भारतात आली होती. भारतात पोहोचल्यावर जॅकलिनने दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या ‘अलादिन’साठी ऑडिशन दिले आणि तेव्हा तिची निवड झाली. हा तिचा पहिला चित्रपट होता.

‘अलादिन’ चित्रपटात जॅकलिनविरुद्ध रितेश देशमुख काम करत होता, तर जॅकलिनला पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. बच्चन यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.

सलमान खानने भेट म्हणून दिला होता ३ बीएचके फ्लॅट
जॅकलिनचा पहिला हिट चित्रपट हा ‘मर्डर २’ होता. यानंतर तिला चित्रपटसृष्टीत चांगली ओळख मिळाली. ‘मर्डर २’ च्या यशानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २०१२ मध्ये जॅकलिनचे ‘हाऊसफुल २’ आणि २०१३ मध्ये ‘रेस ३’ हे चित्रपट आले. याव्यतिरिक्त जॅकलिन २०१४ मध्ये ‘किक’ चित्रपटात सलमान खानसोबतही झळकली. असे म्हणतात की, ‘किक’च्या यशानंतर सलमान खानने तिला वांद्रे येथे ३ बीएचके फ्लॅट भेट म्हणून दिला होता.

भाषांचे उत्तम ज्ञान
विशेष म्हणजे जॅकलिनला भाषांचे उत्तम ज्ञान आहे. तिला स्पॅनिश, फ्रेंच आणि अरबी या भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात.

जॅकलिनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर ती प्रिन्स हसन बिन रशीद अली खलिफाला डेट करत होती. एका सामान्य मित्राच्या पार्टीत ती हसनला भेटली होती. पण जॅकलिनला ‘हाऊसफुल २’ हा चित्रपट मिळाल्यावर दोघांच्या रिलेशनमध्ये दुरावा आला. त्यांचे नातेसंबंध बिघडण्याचे कारण दिग्दर्शक साजिद खान यांना धरले जाते.

जॅकलिनचा आगामी चित्रपट ‘भूत पुलिस’ आहे. ती सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामिनी गौतमसोबत या चित्रपटात दिसणार आहे. जॅकलिन अनेक कामामध्ये व्यस्त आहे. ती ‘बच्चन पांडे’, ‘सर्कस’, ‘अटॅक’ आणि ‘विक्रांत रोना’ या कन्नड चित्रपटामध्ये ​काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा